आज विजयादशमी, म्हणजेच हिंदूंच्या धर्मविजयाचा दिवस ! आजचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. श्री दुर्गादेवी आणि प्रभु श्रीराम यांनी महिषासुर अन् रावण या असुरांचा वध करून आसुरी (अधर्मी) शक्तींचे निर्मूलन केले, ते याच दिवशी ! शुंभ, निशुंभ, महिषासुरादी प्रबल दैत्यांवर देवीने आणि अहंकारी रावणावर श्रीरामाने विजय मिळवला, तो दिवसही विजयादशमीचाच ! पांडवांचा अज्ञातवास मोडण्यासाठी कौरवांनी विराट देशाच्या सीमा ओलांडल्या. त्या वेळी अर्जुनाने शमीच्या ढोलीतून शस्त्रे काढून सीमोल्लंघन केले आणि कौरवसेनेवर विजय प्राप्त केला होता. देवीने नवरात्रोत्सवात विविध अवतार घेऊन असुरांचे निर्दालन केले. श्रीरामानेही रावणाचा वध करण्यापूर्वी नवरात्रीच्या काळात देवीची उपासना करून तिच्याकडून वरदानरूपी शस्त्रे घेऊन रावणाचा संहार केला. छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर भवानीदेवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढील स्वारीचे बेत ठरवत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसर्या राजावर स्वारी करण्यास जात असत. हा आपल्या पराक्रमाचा आणि विजयाचा इतिहास आहे. अर्थात् या विजयाचे केवळ स्मरण न करता या सर्वांनी विजय कसा संपादन केला, असुरांचे निर्दालन कसे केले, हे लक्षात घेऊन आपणही विजयोपासनेच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत !
विजयपताका फडकावणे हे हिंदूंचे आद्यकर्तव्य !
सध्या सर्वत्र हिंदूंवरील आघातांचे अराजक माजले आहे. भारतीयत्व आणि हिंदुत्व नष्ट करण्यासाठी इस्लामी राष्ट्रे टपूनच बसली आहेत. हिंदूंची नृशंस हत्यांकाडे घडवली जात आहेत. ‘सर तन से जुदा’ या घोषणेने तर देशात हिंसाचारच माजवला आहे. भ्रष्टाचार, खून, धर्मांतर, आतंकवाद, फुटीरतावाद, नक्षलवाद यांनी उच्चांक गाठलेला आहे. सर्वच ठिकाणी हिंदूंना पराभवाला सामोरे जावे लागत आहे. का ? तर आज हिंदू संघटित नाहीत. सण-उत्सव साजरे करण्यासाठी आज हिंदू एकवटतात, हे खरे; पण अन्याय किंवा अत्याचार यांच्या विरोधात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच हिंदू एकत्र येतात. हिंदूंसाठी प्रतिकूल असणार्या सध्याच्या काळात हे दुर्दैवीच आहे. आजच्या विजयादशमीनिमित्त हिंदूंनी याचा विचार करायला हवा ! नवरात्रीत एकीकडे दुर्गेची उपासना केली जाते; पण दुसरीकडे महिलांवरील बलात्कार आणि अत्याचार वाढतच आहेत. ही विसंगती हिंदूंना दिसत नाही का ? असे होणे हा देवीतत्त्वाचा अवमान नव्हे का ? या आणि अशा अनेक संकटांचा हिरीरीने सामना करणे अन् त्यातून तावून सुलाखून बाहेर पडून विजयाची पताका फडकावणे हे भारतियांचे पर्यायाने हिंदूंचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे कर्मकांड म्हणून दसरा साजरा न करता विजयादशमीनिमित्त सर्वांनीच यासाठी शुभसंकल्प करायला हवा आणि त्यासाठी स्वतःत विजिगीषू वृत्ती वृद्धींगत करावी.
पराक्रमाची विजयपताका फडकवा !
हे सर्व साध्य करण्यासाठी विजयोपासनेचीच आवश्यकता आहे. ही उपासना करायची कशी ? आपल्याला व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर विजय मिळवायचा आहे. साधना वाढवून धर्मकार्याचा उत्तरोत्तर प्रसार करणे आणि स्वतःतील दोष अन् अहं यांचे निर्मूलन करणे हा यातील प्राथमिक टप्पा आहे. तो साध्य झाल्यास सीमोल्लंघनाचे पुढील पाऊल उचलता येईल. त्याअंतर्गत भ्रष्टाचारासारख्या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच हिंदूंवरील अन्याय, अत्याचार यांविरोधात लढा देणे, देशद्रोही शक्तींना विरोध करण्यासाठी सनदशीर मार्ग अवलंबणे या कृती येतील. याच माध्यमातून विजयाचे एकेक शिखर आपण पादाक्रांत करू शकतो. विजयाचा आदर्श आपल्यासमोर ठेवणार्या देवता, संत, महापुरुष यांचेही या निमित्ताने आपण स्मरण करायला हवे. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर पराक्रमाची विजयपताका संपूर्ण विश्वात फडकेल, तो दिवस आता दूर नाही ! तो दिवसच हिंदूंसाठी खर्या अर्थाने विजयोत्सव असणार आहे.
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, पनवेल. (१.१०.२०२२)