मुंबई – वाढत्या खासगी वाहनांमुळे मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. माहिम येथील सेनापती बापट मार्गावरील मच्छिमार वसाहतीचा रस्ता वांद्रे पूर्व भागातील पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने २३८ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या पुलामुळे पश्चिम भागातील वाहतुकीच्या समस्या काही प्रमाणात सुटू शकतील.