महापूर आणि ढगफुटी यांची शक्यता
मुंबई – ४ ऑक्टोबरनंतर ‘निंबोस्ट्रेटस’ ढगांची निर्मिती प्रक्रिया होऊन महाराष्ट्रात जानेवारी २०२३ पर्यंत पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे. सद्य:स्थितीत पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस असून अद्याप मान्सूनला प्रारंभ झाला नाही. सप्टेंबरच्या शेवटी पाऊस वाढणार असून महापुराचा धोका कायम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
यंदा जुलैमध्ये झालेला पाऊस सूर्यावरील चुंबकीय वादळांमुळे झाला. या वर्षी अद्याप एकही प्रबळ चक्रीवादळ सिद्ध झाले नाही, ही गंभीर गोष्ट आहे. ‘पालटलेल्या मान्सूनच्या स्थितीला शेतकरी आणि सामान्य जनता यांनी येत्या काळात घाबरून जाऊ नये’, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरलेली आहेत; मात्र डिसेंबरपर्यंत पडणारा मोठा पाऊस धरणे आणि बंधारे यांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे आताच यातील पाणी टप्प्याटप्प्याने सोडणे आवश्यक आहे. यासाठी शेतीचे नियोजन आणि शेतकर्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणे भरलेली आहेत. जानेवारी २०२३ मध्ये ढगफुटीसह मोठा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आताच धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. परिणामी गोदावरीसह सर्वच नद्यांना आणि सायखेड्यासारख्या गावांना महापुराचा धोका होण्याची शक्यता शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केली आहे.