‘सनातन चैतन्यवाणी ॲप’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन ऐकून प्रभावित झालेल्या जिज्ञासूंना स्वतःत जाणवलेले पालट !

‘मी साधनेत येण्यापूर्वी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर प्रवचनाला उपस्थित रहाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. गुरुदेवांच्या मधुर वाणीतील मार्गदर्शनाचा त्या वेळी माझ्यावर असा काही परिणाम झाला होता की, ‘ती ‘दैवी वाणी’ सतत ऐकत रहावी’, असे मला वाटत होते. नंतर त्यांचे मार्गदर्शन असलेली ध्वनीचकती मी विकत घेतली आणि त्यातील मार्गदर्शन मी पुनःपुन्हा लक्षपूर्वक ऐकत असे. गुरुदेवांच्या मधुर वाणीतील तेच मार्गदर्शन ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वर उपलब्ध असल्याचे समजल्यावर ते सत्संगातील जिज्ञासूंना पाठवण्याचा आणि ‘ते ऐकल्यानंतर जिज्ञासूंना काय शिकायला मिळाले ?’, हे जाणून घेण्याचा विचार देवाने मला दिला. त्याप्रमाणे केल्यानंतर ‘जिज्ञासूंना गुरुवाणीतील मार्गदर्शनाचा पुष्कळ लाभ होत आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यांपैकी काही अभिप्राय येथे देत आहे.’ – सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर, पडेल, देवगड, सिंधुदुर्ग.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्री. अक्षय देशमुख (वय २५ वर्षे), यवतमाळ

१ अ. ‘अध्यात्माविना जीवन नाही’, हे लक्षात येणे : ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांचे मार्गदर्शन ऐकले. मला त्यातून पुष्कळ शिकायला मिळाले. सर्र्वांत महत्त्वाची गोष्ट कळली की, ‘आपण गरीब लोकांना अन्न-पाणी देतो, त्यांच्यासाठी रुग्णालये बांधतो; पण ‘ते त्यांच्या प्रारब्धानुसार होत आहे’, हे त्यांच्या गरिबीचे कारण त्यांना कुणी सांगत नाही. एका वाक्यात सांगायचे झाले, तर ‘अध्यात्माविना जीवन नाही’, हे माझ्या लक्षात आले.’ (२५.३.२०२२)

सौ. ज्योत्स्ना नारकर

२. कु. अश्विनी काटकर (वय २७ वर्षे), कराड

२ अ. ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वरून प्रतिदिन परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन ऐकणे : ‘मी ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’मधील गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) मार्गदर्शन ऐकले आणि इतरांनाही ऐकण्यासाठी पाठवले. मी त्यांचे मार्गदर्शन २ वर्षांपूर्वी संग्रहित (डाऊनलोड) करून ठेवले होते. ते अजूनही माझ्या भ्रमणभाषमध्ये आहे. आता मी प्रतिदिन ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वरून ते ऐकण्याचा प्रयत्न करते.

२ आ. परात्पर गुरुदेवांच्या चरणांशी जायचे आहे ! : मला परात्पर गुरुदेवांचा आवाज पुष्कळ आवडतो. कधी कधी मी नामजप करतांना किंवा मला झोप येत असतांना त्यांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ते सत्संगात कसे बोलतात, ते आठवण्याचा प्रयत्न करते. मला परात्पर गुरुदेवांच्या चरणांशी जायचे आहे.’  (२६.२.२०२२)

३. सौ. वसुधा संतोष गुरव (वय ४० वर्षे), प्राथमिक शिक्षिका, कोल्हापूर

३ अ. डॉ. जयंत आठवले यांनी माझ्या आयुष्याला एक नवी दिशा दिली ! : ‘मी आज स्वतःला एक आनंदी व्यक्ती मानते. डॉ. जयंत आठवले यांच्या वाणीतील मार्गदर्शन ऐकून माझ्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. ते ऐकतांना ‘चैतन्य काय आहे ? कोणत्याही कठीण प्रसंगात संयम कसा ठेवावा ? नेहमी मन प्रसन्न कसे ठेवावे ?’, अशा अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या. मला नामजपाचे महत्त्व अनुभवातूनच पटले. माझे मन कधीच शांत नसायचे. माझ्या डोक्यात सतत काही ना काही विचार असायचेच. त्या अनावश्यक विचारांनी माझे मन, मेंदू आणि शरीर हेही थकायचे; मात्र आता नामजप केल्यामुळे मनाला उत्साह वाटतो. ‘आता मी एकटी नाही, तर माझ्या समवेत कुणीतरी आहे’, असे मला जाणवते. ‘आनंद व्यक्ती आणि वस्तू यांवर अवलंबून नाही, तर आपल्या मनावर अवलंबून आहे’, हे माझ्या लक्षात येऊ लागले.

३ आ. आध्यात्मिक मार्गदर्शन लाभून मन शांत, प्रसन्न आणि समाधानी होणे : जीवनात अनेक सुखसोयी आल्या; पण ‘आणखी हवे’, ही माझी भूकही वाढली. अध्यात्मात तसे नाही. मला अध्यात्माविषयी जसे समजत गेले, तसे मला शांत, प्रसन्न आणि समाधानी वाटत आहे. ‘मला असेच मार्गदर्शन लाभू दे’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

३ इ. सत्संग ऐकतांना रामराज्यात असल्याचा अनुभव घेत असणे : ‘सुसंगती सदा घडो । सुजन वाक्य कानी पडो ।।’ या उक्तीप्रमाणे या सत्संगाची संगत आहे. अभ्यासपूर्ण आणि भरपूर उदाहरणे देऊन समजावून सांगण्याच्या पद्धतीमुळे आपली भारतीय संस्कृती माझ्यासमोर नव्याने उलगडत आहे. ‘भारतीय सण निसर्गाशी किती निगडित आहेत’, हे माझ्या लक्षात आले. सत्संग ऐकतांना प.पू. डॉ. आठवले यांच्या गोड वाणीमुळे आणि बोलण्यातील नम्रतेमुळे मी अगदी रामराज्यात असल्याचा अनुभव घेत असते.

३ ई. मन पुष्कळ शांत होऊन ‘काळजी करायची नाही’, हे लक्षात येणे : माझे मन पुष्कळ शांत होते. हा सत्संग ऐकण्याच्या आधी माझा वेळ न घडणार्‍या आणि घडणार्‍या सगळ्या गोष्टींची विनाकारण काळजी करण्यातच जायचा; पण आता ‘काळजी करायची नाही’, असे माझ्या लक्षात आले.

३ उ. प्रत्येक गोष्टीत नवचैतन्याचा अनुभव येणे : ‘कोणतेही नवीन काही चालू करायचे, म्हणजे अनंत अडचणी येतात; पण आता ‘आपल्या अडचणी सांगाव्यात’, असे वाटत नाही. सत्संगातील ताई आणि दादा यांना न भेटता आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष न बोलताही ते आपल्याला जवळचे वाटतात. सत्संगात ताई आणि दादा यांचे त्यांना नामजप करतांना आलेले अनुभव ऐकल्यावर मला तसेच अनुभव आल्याचे लक्षात आले. जसे मन एकाग्र होईल, तसा ‘नामजप असाच चालू ठेवावा’, असे मला वाटते. ‘खाणे-पिणे आणि हिंडणे’, केवळ हेच जीवन नाही. परमेश्वराचे नाव घेऊन पहिला घास घेतांना वेगळीच अनुभूती येते. सकाळी उठल्यावर पाण्याचा घोट घेतांना परमेश्वराची आठवण ठेवल्यावर तेच पाणी अमृताचा अनुभव देते. इकडे-तिकडे फिरतांना प्रत्येक गोष्टीत नवचैतन्याचा अनुभव येतो.’ (१९.३.२०२२)

४. श्री. अरुण बोरवणकर, भाग्यनगर (तेलंगाणा) : ‘गुरुदेवांनी सोप्या भाषेत अध्यात्म समजावून सांगितले आहे.’ (३०.३.२०२२)

५. सौ. स्नेहाली घाट्ये, गिर्ये, सिंधुदुर्ग : ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वरील गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकले. तेव्हा पुष्कळ छान वाटले. ‘ते सतत चालूच रहावे, संपूच नये’, असे मला वाटत होते.’  (३०.३.२०२२)

६. श्रीमती शीतल प्रभुकेळुसकर (वय ६२ वर्षे), सिंधुदुर्ग  : ‘गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकले. साधनेविषयी पुष्कळ अमूल्य माहिती मिळाली. ‘त्यांचे मार्गदर्शन पुनःपुन्हा ऐकावे’, असे वाटते. पुष्कळ आनंद मिळाला. कृतज्ञता !’  (३०.३.२०२२)

७. सौ. पूर्वा गावडे, प्राथमिक शिक्षिका, सिंधुदुर्ग  – सद्गुरूंनी साधनेचे महत्त्व सहजतेने स्पष्ट केले आहे ! : ‘सद्गुरूंचे मार्गदर्शन ऐकतांना ‘आणखी मार्गदर्शन लाभावे’, असे मला वाटते. ‘सध्याच्या काळात साधना का आणि कशी महत्त्वाची आहे ?’, हे सद्गुरूंनी सहजतेने स्पष्ट केले आहे. गुरुचरणी कोटीशः धन्यवाद !’  (३०.३.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक