डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील तबला वादक श्री. योगेश सोवनी यांनी व्यक्त केलेले मनोगत !

तबला वादक (अलंकार) श्री. योगेश सोवनी यांचा परिचय !

श्री. योगेश सोवनी उत्तम तबला वादक आहेत. ते मूळचे सांगली येथील असून सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी तबला वादनाचे शिक्षण आरंभी सांगली येथील श्री. रमेश गोखले आणि श्री. निशिकांत बडोदेकर यांच्याकडे घेतले. कालांतराने त्यांनी उस्ताद अल्लारख्खां, उस्ताद झाकीर हुसेन, पखवाज मास्टर पं. भवानी शंकर आणि पं. सुधीर माईणकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेतले. त्यांनी तबल्यात ‘अलंकार’ ही पदवी प्राप्त केली आहे.

त्यांनी श्रीमती प्रभा अत्रे, पं. सुरेश वाडकर, श्री. अनुप जलोटा यांच्यासारख्या नामांकित गायकांना तबल्याची साथ केली आहे. त्यांनी एकल (सोलो) तबला वादनाचेही कार्यक्रम केले आहेत.

२३ ते २८.३.२०२२ या कालावधीत तबला वादक श्री. योगेश सोवनी यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य होते. त्यांनी रामनाथी आश्रमाला प्रथमच भेट दिली होती. तेव्हा ते आश्रमातील वातावरण पाहून भारावून गेले. त्यांनी आश्रमातील वास्तव्य ते आश्रमातून परतीपर्यंतच्या कालावधीतील अनुभव, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. त्यांना आश्रमातील वास्तव्याच्या कालावधीत काही अनुभूतीही आल्या. त्या त्यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केल्या. त्यांनी आश्रमाविषयी विशद केलेले भावपूर्ण मनोगत येथे दिले आहे.

श्री. योगेश सोवनी

१. उत्तम तबला वादक असूनही स्वतःला विद्यार्थीच समजणे

‘मला प्रथमतःच साधक श्री. मनोज सहस्रबुद्धे (सतार वादक, आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांच्यामुळे आश्रमात यावयास मिळाले, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. आश्रमात आल्यावर तुम्ही (साधकांनी) जे स्वागत केले, आपुलकीने सन्मान दिलात अन् माझ्या कलेचा सन्मान केलात, त्यामुळे आपणा सर्वांविषयी माझ्या मनात आदरणीय स्थान निर्माण झाले; परंतु तुम्ही दिलेला मान, सन्मान स्वीकारण्याइतपत मी काही मोठा कलाकार नाही. मी अजून विद्यार्थीच आहे.

२. परात्पर गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या मार्गदर्शनानुसार होत असलेल्या संशोधन कार्याने आश्चर्यचकित होणे

आश्रमात मी ३ दिवस जे बघितले, अनुभवले, त्या गोष्टी मी कधीच विसरू शकणार नाही. भारतामध्ये गोव्याला एक वेगळे सौंदर्य मिळाले आहे. ‘उत्तम निसर्गाच्या सानिध्यात आश्रम आहे आणि त्या आश्रमात संशोधन केले जात आहे’, हे वाखाणण्याजोगेच आहे. तेथे संशोधन करण्याकरता चांगले साधक आहेत.  येथे चालू असलेले कार्य बघून मी आश्चर्यचकित झालो आणि या सर्वांना प.पू. गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मार्ग दाखवत आहेत. ‘त्यांच्या आशीर्वादाने हे कार्य पूर्ण होईल’, यात शंकाच नाही.

इथे मला श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांची तबल्याच्या साथीला मिळालेली संगत अत्यंत महत्त्वपूर्ण होती. इथे मी जे काही वाजवण्याचा प्रयत्न केला, तो माझ्या गुरुजनांमुळेच !

३. आश्रमातील आकर्षित करणार्‍या गोष्टी

मी आश्रमात खालील तीन गोष्टी बघून आकर्षित झालो, ज्यामुळे ‘मला वारंवार आश्रमात यावे’, असे वाटते.

अ. दत्तगुरूंचा आशीर्वाद देणारा औदुंबर वृक्ष (रामनाथी आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ औदुंबराचा वृक्ष आहे.)

आ. विद्येची देवता आणि प्रथम पूजेची देवता असलेली श्री गणपतीची मूर्ती

इ. साक्षात् आदरणीय गुरु परम पूज्य डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले)

इथे (रामनाथी आश्रमात) स्वर्गातील सर्वच गोष्टी आहेत.

४. रामनाथी आश्रमात असतांना आलेल्या अनुभूती

४ अ. रामनाथी आश्रमातील श्री गणपतीची मूर्ती खूप जागृत असल्याचे मला जाणवले. तिच्या स्थानी गेल्यावर मला विलक्षण जाणवले.

४ आ. सनातनचे संत पू. सौरभदादा यांना भेटून आनंद होणे, तसेच स्वप्नातही त्यांच्याशी बोलत असल्याचे दिसणे : सनातनचे संत पू. सौरभदादा यांच्या भेटीच्या दरम्यान मला खूप आनंद जाणवला. त्याच रात्री माझ्या स्वप्नात पू. सौरभदादा आले आणि ‘मी त्यांच्याशी त्यांच्या खोलीत बोलत आहे’, असे मला जाणवले. प्रत्यक्षातही मला त्यांना पुन्हा भेटण्याची इच्छा जागृत झाली.

५. रामनाथी आश्रमाचे व्यवस्थापन आणि अन्य कार्यालयांचे व्यवस्थापन यांची तुलना करणे अशक्य !

आश्रमातील सर्वच भाग खूप चांगला आहे. साधकांमधील प्रेमभाव, एकमेकांना सहजतेने साहाय्य करणे इत्यादी गोष्टी भावल्या. इथे एवढ्या संख्येने साधक रहात असून सगळ्यांचे सेवाकार्य सुरळीत होत आहे. त्यात कुठेही कमतरता जाणवली नाही. बाहेरच्या कार्यालयामध्ये (‘ऑफीस’मध्ये) ज्याप्रमाणे कारभार चालतो, त्याच्याशी रामनाथी आश्रमातील व्यवस्थापनाची तुलनाच होऊ शकत नाही, एवढे चांगले आश्रमातील व्यवस्थापन आहे.

६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाचे क्षण सुखदायक वाटणे

श्री परम पूज्य आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचा छान सुंदर, मनाला शांतता देणारा, स्फूर्ती देणारा मोलाचा आशीर्वाद आणि त्यांचे मृदु बोलणे इत्यादी क्षण मला सुखदायक होते.

७. आश्रमात पुन्हा येण्याची तळमळ

‘मी परत येईन’, असे मनापासून म्हणतो आहे. इथे येऊन मी तबला वादन करीन किंवा जे काही बोलेन, तेही परम पूज्यांच्या आणि माझ्या गुरूंच्या आज्ञेनेच बोलेन.

८. रामनाथी आश्रमात येतांना अन् परतीच्या प्रवासात आलेली अनुभूती

रामनाथी आश्रमात येतांना मनात ‘संत भार पंढरीत’ हे भक्तीगीत येत होते, तर आश्रमातून घरी मुंबईला परत जातांना ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ हे भक्तीगीत होते.

‘मला परत सेवा करण्याची संधी द्यावी’, ही नम्र विनंती आहे. ‘या मंदिरात श्री गुरुवर्य परम पूज्यांसमोर मला वाजवायला मिळावे आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा’, अशी प्रार्थना करतो.’

आपला,

योगेश सोवनी (श्री. योगेश सोवनी, तबलावादक (अलंकार) डोंबिवली.) (२८.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक