स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवणार आहे. ‘या कालावधीत अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे’, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. सरकारची ध्वजसंहिता अतिशय कठोर आहे. आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर ती शिथिल करण्यात आली आहे. ध्वजसंहितेत नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत आणि नियमांचा भंग झाल्यास काय शिक्षा आहे, याची माहिती पुढे दिली आहे.
‘हर घर तिरंगा’ मोहीम नक्की काय आहे ?केंद्र सरकारने या मोहिमेच्या अंतर्गत २० कोटी घरांवर राष्ट्रध्वज फडकावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भारतातील अधिकाधिक नागरिकांनी त्यांच्या घरांवर राष्ट्रध्वज फडकावण्याचे आवाहन भारत सरकारकडून करण्यात आले आहे. लोकांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. |
भारताची ध्वजसंहिता काय आहे ?
राष्ट्र्रध्वज फडकावण्यासाठी ‘ध्वजसंहिता २००२’चे, तसेच ‘राष्ट्रीय प्रतीक अपमानविरोधी कायदा १९७१’चे पालन करावे लागते. २६ जानेवारी २००२ या दिवशी ‘ध्वजसंहिता २००२’ अस्तित्वात आली. याआधी ‘राष्ट्रीय प्रतीक आणि नावे कायदा १९५०’ आणि ‘राष्ट्रीय प्रतीक अपमानविरोधी कायदा १९७१’ अस्तित्वात होते. ‘ध्वजसंहिता २००२’मध्ये २० जुलै २०२२ या दिवशी काही पालट करण्यात आले.
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास शिक्षेची तरतूद
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास ३ वर्षे कारावास आणि पहिल्यांदाच गुन्हा केल्यास दंड ठोठावण्याची तरतूद आहे.
राष्ट्रध्वज फडकावतांना खालील सूत्रे लक्षात ठेवा !
१. ध्वज फडकावतांना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तो व्यवस्थित ठिकाणी फडकावावा.
२. भारताचा राष्ट्रध्वज ज्या उंचीवर फडकावला आहे, त्याच्या बरोबरीच्या किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावू नये.
३. कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये.
४. ध्वज फडकावतांना केशरी रंग वर राहील, याची दक्षता घ्यावी.
५. ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर, फुले, पाने, फुलांचे हार ठेवू नयेत.
६. ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये.
७. ध्वजारोहणासाठी झेंडा बनवतांना त्यात फुले आवश्यक असल्यास ठेवता येतील.
८. राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसेच पाण्यावर तरंगलेला नसावा.
९. कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर ध्वजाचा वापर करू नये. तसेच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचे कव्हर, अंतर्वस्त्र यांसाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये.
१०. जेव्हा ध्वज फडकावतो, तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.
ध्वजसंहितेत झालेले पालट
ध्वजसंहितेत केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल. या आधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकावण्याची अनुमती होती. यासह तो खुल्या जागेवर किंवा घरावरही फडकावण्याची अनुमती देण्यात आली आहे. हा पालट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यापुरता आहे. हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.