सातारा येथे पोलीस असल्याचे सांगून महिलेचे दागिने पळवले !

सातारा, ३० जुलै (वार्ता.) – पोलीस अधिकारी असल्याचे सांगत ३ अनोळखी व्यक्तींनी उपासनेसाठी पायी जाणार्‍या महिलेला फसवून ४ लाख २५ सहस्र रुपयांचे दागिने पळवून नेले. याविषयीची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आली आहे.

शहरातील माजी नगरसेविका सौ. प्राची शहाणे यांच्या सासूबाई आणि भाजपचे प्रवीण शहाणे यांच्या मातोश्री सौ. शिल्पा प्रमोद शहाणे (वय ७२ वर्षे) उपासनेसाठी चालल्या होत्या. सायंकाळी ५.३० वाजता २ अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी स्वत: पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्याचवेळी तिसरा व्यक्ती तिथे आला आणि हे दोघेजण खरे बोलत असल्याचे सांगितले. त्या वेळी सौ. शिल्पा यांच्या गळ्यातील १ लाख ७५ सहस्र रुपये किमतीची साडेतीन तोळ्याची सोन्याची साखळी आणि त्यात गोवलेले मंगळसूत्र, तसेच २ लाख ५० सहस्र रुपये किमतीच्या ४ सोन्याच्या बांगड्या असे एकूण ४ लाख २५ सहस्र रुपये किमतीचे दागिने काढून घेतले. ‘हे दागिने आम्ही व्यवस्थित ठेवतो’, असे सांगून ते पसार झाले. ‘पायी जाणार्‍या नागरिकांना लुटण्याच्या घटनांत वाढ झाली असून नागरिकांनी सतर्क रहावे’, असे आवाहन शाहूपुरी पोलिसांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण ! चोरांची अशी मानसिकता देशासाठी घातक आहे. अशा तोतया पोलिसांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !