गोव्यात भूमी बळकावल्याच्या प्रकरणी विविध खात्यांतील अधिकार्‍यांनंतर ‘नोटरी’चाही सहभाग असल्याचे उघड

(नोटरी म्हणजे करार आणि दस्तऐवज यांवर दाखले देणारा अधिकारी)

भूमी घोटाळ्यातील अनेकांचा सहभाग पाहिल्यास कुठलाही भ्रष्टाचार हा सर्व संबंधितांच्या सहमतीनेच चालतो, हे स्पष्ट !

पणजी, २५ जुलै (वार्ता.) – भूमी बळकावल्याच्या प्रकरणी पुरातत्व खात्याचे कर्मचारी, महसूल खात्याचे अधिकारी, मामलेदार, स्थानिक संस्थांचे प्रशासक यांचा सहभाग असल्याचे यापूर्वी उघड झालेले आहे; मात्र यामध्ये ‘नोटरी’चाही सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावणे आणि तिची पुढे विक्री करणे या साखळीमुळे भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे दिसत आहे. संबंधित ‘नोटरी’ने भूमीशी निगडित अनेक बनावट कागदपत्रे ‘नोटराईझ’ (प्रमाणित) केल्याने भूमी बळकावणार्‍यांना पुढील सर्व प्रक्रिया करणे सुलभ झाले आहे.

म्हापसा येथील दिवाणी न्यायालयात उपलब्ध असलेल्या कागदपत्रानुसार भूमी बळकावल्याच्या अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद झालेला संशयित रॉयसन रॉड्रिग्स याने सर्वेक्षण नोंदींमध्ये स्वत:चे नाव समाविष्ट केले. वास्तविक ‘नोटरी’ असलेल्या अधिवक्त्याने कोणतेही कागदपत्र ‘नोटराईझ’ करण्यापूर्वी त्या कागदपत्रांची विश्वासार्हता पडताळणे आणि कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या व्यक्तींची ओळख पटवून घेणे कायद्याने आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रात नमूद असलेल्या व्यक्ती स्वाक्षरीसाठी स्वत: ‘नोटरी’ कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक असते. या सर्व कायदेशीर गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच एखादे कागदपत्र ‘नोटराईझ’ केले जाऊ शकते. संशयित रॉयसन रॉड्रिग्स यांनी १७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी आसगाव येथील सर्व्हे क्रमांक ४४/२च्या भूमीचे ‘म्युटेशन’ (भूमीच्या मालकी हक्काच्या प्रक्रियेतील एक टप्पा) करण्यासाठी एक प्रतिज्ञापत्र सुपुर्द केले. यामध्ये संशयित रॉयसन रॉड्रिग्स याने ब्रांका रॉड्रिग्स यांनी त्याला ‘पावर ऑफ ॲटर्नी’ (अधिकारपत्र) दिल्याचे दाखवून स्वाक्षरी केली आहे. एका भूमीच्या ‘म्युटेशन’ प्रक्रियेमध्येही भूमीशी संबंधित व्यक्तींना नोटिसा पाठवण्यासाठी १ मार्च २०२२ या दिवशी प्रतिज्ञापत्र सिद्ध करण्यात आले. या प्रतिज्ञापत्रावरही संशयित रॉयसन रॉड्रिग्स याने ब्रांका रॉड्रिग्स यांच्यासाठी स्वाक्षरी केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ब्रांका रॉड्रिग्स यांचे निधन झालेले असतांनाही रॉयसन रॉड्रिग्स याने ब्रांका रॉड्रिग्स यांनी ‘पावर ऑफ ॲटर्नी’ दिल्याचे प्रतिज्ञापत्र सिद्ध केले. कायद्यानुसार एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर तिच्या नावाने करण्यात आलेली ‘पावर ऑफ ॲटर्नी’ (अधिकारपत्र) नियमबाह्य ठरते. याहून पुढे धक्कादायक गोष्ट म्हणजे या बनावट प्रतिज्ञापत्राच्या आधारे बार्देश तालुक्याच्या मामलेदाराने ‘म्युटेशन’ प्रक्रियेचा एका भाग म्हणून वृत्तपत्रांमध्ये भूमीसंबंधी नोटीस प्रसिद्ध करण्यास अनुमती दिली. भूमी बळकावणारी टोळी आणि नोटरी यांचे साटेलोटे असलेली अनेक प्रकरणी उघडकीस आली आहेत.