इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली थेट वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू ! – प्रताप होगाडे, वीजतज्ञ

प्रताप होगाडे, वीजतज्ञ

इचलकरंजी – राज्यातील घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक आणि अन्य सर्व २ कोटी ८७ लाख ग्राहकांवर जुलै २०२२ मध्ये मिळालेल्या देयकापासून ५ मासांसाठी ‘इंधन समायोजन आकार’ या नावाखाली थेट वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. तसेच थकित इंधन समायोजन आकार १ सहस्र २२६ कोटी रुपये, उद्योगपती अदानी यांचे राहिलेले देणे ७ सहस्र ७०९ कोटी रुपये, तसेच समान करार असलेल्या ‘रतन इंडिया’चे देणे, अशा प्रकारची ही वाढ डिसेंबर २०२२ पासून लागू होऊ शकते, अशी माहिती ‘महाराष्ट्र वीज ग्राहक संघटने’चे अध्यक्ष आणि वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, महावितरण आस्थापन सप्टेंबर २०२२ नंतर फेरआढावा याचिका प्रविष्ट करणार, हे निश्चित आहे. या याचिकेद्वारे २ वर्षांच्या कोरोना महामारीच्या काळातील तूट आणि खर्चातील वाढ, या नावाखाली पुन्हा २० सहस्र कोटी रुपयांची अधिक वाढ मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आजच जागरूकतेने या दरवाढीस विरोध करणे आणि शासनाने हस्तक्षेप करणे, यांसाठी चळवळ, आंदोलन करणे आवश्यक आहे. यासाठी ‘राज्यस्तरीय समन्वय समिती’ने ४ ते ११ ऑगस्ट या कालावधीत राज्यात सर्वत्र जिल्हा, विभाग अथवा तालुका स्तरावर आंदोलन घोषित केले आहे.