(म्हणे) ‘हिजाबला विरोध; मात्र रणवीर सिंग यांचे ‘न्यूड फोटोशूट’ चालते !’

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे निरर्थक वक्तव्य

सोलापूर – देशात मुसलमान महिलांनी हिजाब परिधान केल्यास विरोध होतो; मात्र अभिनेता रणवीर सिंग यांच्या ‘न्यूड फोटोशूट’ला (नग्न छायाचित्रीकरण) कुणीही विरोध करत नाही, असे निरर्थक वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली. ते सोलापूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. (दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी कसलाही संबंध नसतांना अबू आझमी यांचे वक्तव्य म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे. ‘या वक्तव्यावरून पुन्हा अनावश्यक वाद उकरून काढून प्रसिद्धीझोतात रहाण्याचा आझमी प्रयत्न करत आहेत’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)

या वेळी आझमी म्हणाले की, देशात काही चित्रपटकर्ते नग्न छायाचित्र काढू शकतात; मात्र मुसलमान महिला हिजाब परिधान करू शकत नाहीत. (केवळ शाळा-महाविद्यालयात हिजाबला अनुमती नसतांना कांगावखोरपणा करणारे आझमी ! – संपादक) मुसलमान महिला कपड्यांच्या आतमध्ये काहीतरी चोरून आणतील किंवा लहान मुले चोरून नेतील, अशी भीती वाटत असेल, तर संबंधित महिला ज्या विभागात हिजाब परिधान करून जातात, त्या विभागात महिलेकडून मुसलमान महिलांची पडताळणी करा.