रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जातांना आणि तेथे झालेल्या युवा साधना शिबिराच्या वेळी सोलापूर येथील कु. श्रेया गुब्याड यांना आलेल्या अनुभूती

१. रामनाथी आश्रमात जातांना आलेल्या अनुभूती

कु. श्रेया गुब्याड

१ अ. आश्रमात निघण्यापूर्वी ३ संतांचे दर्शन होणे आणि सद्गुरूंच्या संकल्पाने कार्यशाळेत शिकता येणे : ‘सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे जाण्यासाठी सर्व साधक सोलापूर सेवाकेंद्रात एकत्र जमले होते. निघण्याच्या आधी सकाळी आम्हाला पू. (कु.) दीपाली मतकर, पू. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू आणि सद्गुरु स्वाती खाडये भेटल्या. ३ संतांचे एकत्रित दर्शन झाल्याने मला पुष्कळ आनंद झाला. तेथून निघतांना सद्गुरु स्वातीताई म्हणाल्या, ‘‘सगळे व्यवस्थित शिकून घ्या.’’ तेव्हा मला ‘त्यांचाच संकल्प कार्यरत झाला’, असे वाटले.

१ आ. संपूर्ण प्रवासात गुरुदेवांनीच काळजी घेणे : आम्ही सोलापूर येथून निघाल्यावर ‘सोलापूर ते कोल्हापूर हा प्रवास सद्गुरु (कु.) स्वातीताईंच्याच गाडीमधून करायचा आहे’, असे मला समजले. तेव्हा मला अधिक आनंद झाला. ‘संपूर्ण प्रवासात गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवले) आमची काळजी घेत होते’, हे वेळोवेळी लक्षात आले.

१ इ. प्रवासात एका साधिकेला सतत उलट्या होणे आणि सामूहिक प्रार्थना केल्यावर त्रास अल्प होणे : आमच्या समवेत असलेल्या एका साधिकेला प्रवासात सतत उलट्या होत होत्या. त्या वेळी पू. (कु.) दीपालीताईंना भ्रमणभाष करून याविषयी सांगितले आणि ‘गुरुदेव, आमच्याभोवती तुमच्या चैतन्याचे संरक्षककवच अखंड राहू द्या’, अशी आम्ही सर्वांनी सामूहिक प्रार्थना केली. त्या वेळी मला एक दृश्य दिसले, ‘त्यात आमची गाडी मार्गावरून जात आहे. गुरुदेवांचा हात सतत गाडीवर आहे आणि त्यांच्या हातातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे. सर्व साधक आणि गाडी यांच्याभोवती चैतन्याचे कवच निर्माण झाले आहे.’ आम्ही सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर ‘त्या साधिकेचा त्रास थोड्या प्रमाणात अल्प झाला आणि गाडीमधील वातावरणातही पालट झाला’, असे मला जाणवले.

थोड्या वेळाने त्या साधिकेला परत उलट्या होऊ लागल्या. तेव्हा पू. (कु.) दीपाली मतकर यांनी आधुनिक वैद्यांना भ्रमणभाष करून गोळ्या विचारल्या. आमच्या समवेत असलेल्या चालक साधकाने तत्परतेने गोळ्या आणून दिल्या. हळूहळू ताईचा त्रास अल्प झाला आणि रामनाथी आश्रमात पोचल्यावर पूर्णच थांबला. तेव्हा ‘गुरुदेव प्रत्येक जिवाची किती काळजी घेत आहेत’, असे मला वाटले. गुरुदेवांनीच आम्हाला सुखरूप आश्रमामध्ये आणले.

२. शिबिराच्या वेळी आलेल्या अनुभूती

अ. ‘आश्रमातील चैतन्यामुळे माझ्यावरील त्रासदायक आवरण गळून पडत आहे’, असे मला जाणवले.

आ. आश्रमात आल्यावर गुरुदेवांच्या कृपेने माझी अंतर्मुखता वाढल्याचे जाणवले.

इ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन चालू होते. तेव्हा अनेकांना दैवी सुगंध आला. मला तोंडामध्ये वेगळी दैवी चव जाणवली. वातावरणामध्ये आनंद आणि शांतता होती, तसेच गारवाही वाढला होता.

ई. ‘शिबिराच्या स्थळी साक्षात् वैकुंठच अवतरले आहे आणि साक्षात् महालक्ष्मीमाताच आम्हा सर्व साधकांना प्रेमाने सत्संग देत आहे’, असे मला जाणवले.

उ. ‘प्रत्येकावर चैतन्याचा वर्षाव होत आहे आणि चैतन्याच्या लहरी पावसाप्रमाणे पडत आहेत’, असे मला जाणवत होते.

ऊ. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई यांच्याभोवती चैतन्याचे वलय दिसत होते आणि त्यातून चैतन्य प्रक्षेपित होऊन शिबिरातील सर्व साधकांच्या भोवतीही चैतन्याचे वलय निर्माण होत आहे’, असे मला जाणवले.’

– कु. श्रेया गुब्याड (वय २० वर्षे), सोलापूर (९.११.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक