३ पिढ्यांपासून शाडूमातीच्या श्री गणेशमूर्ती बनवणारे मिरज (जिल्हा सांगली) येथील जोशी कुटुंबीय !

श्री गणेशमूर्ती बनवतांना मूर्तीकार श्री. रघुनाथ जोशी

मिरज, २२ जुलै (वार्ता.) – ब्राह्मणपुरी येथील श्री. प्रशांत जोशी यांचे कुटुंबीय गेल्या ३ पिढ्यांपासून शाडूमातीच्या श्री गणेशमूर्ती बनवत आहेत. श्री. जोशी यांच्याकडील मूर्ती या नैसर्गिक रंगात रंगवलेल्या आणि पारंपरिक रूपातीलच असतात. श्री. जोशी यांच्याकडे मूर्ती घेऊन जाणारेही ३ पिढ्यांपासूनचे ग्राहक आहेत.

या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री. रघुनाथ जोशी म्हणाले…

१. माझे वडील श्री. हरिभाऊ केशव जोशी यांच्यापासून चालू झालेली ही परंपरा मी आणि माझा मुलगा श्री. प्रशांत यांच्यापर्यंत चालू आहे. आमच्या कुटुंबातील ६ जण सध्या यात सहभागी आहेत. माझ्या वडिलांच्या काळात शाडूमाती ही म्हैशाळ परिसरात शेतात मिळत असे. ती माती बैलगाडीतून वाहून आणावी लागत होती. यानंतर ती माती भिजवणे, गाळणे, तिच्यात कापूस मिसळणे यांसह अन्य प्रक्रिया कराव्या लागत होत्या.

२. आमच्याकडे बनवल्या जाणार्‍या मूर्ती या आम्ही पारंपरिक वेशभूषेतीलच करतो.

३. या मूर्ती करतांना जी शुचिर्भूतता पाळणे आवश्यक आहे, ती पाळूनच आम्ही मूर्ती घडवतो. अलीकडे मात्र या उत्सवाचे आणि मूर्ती बनवण्याचे बाजारीकरण होत आहे. आमच्याकडे असलेल्या मूर्ती या आम्ही ग्राहकांना परवडेल अशाच दरात विकतो.

४. अनंत चतुदर्शी झाली की, काही दिवसांतच या मूर्ती करण्याचे काम आम्ही चालू करतो.

५. श्री गणेशमूर्तींसमवेत गौरी, हरितालिका, तसेच दिवाळीत किल्ल्यांवर ठेवण्याचे मावळे, छत्रपती शिवाजी महाराज यांची मातीची खेळणीही आम्ही सिद्ध करतो. ही खेळणी आम्ही पूर्णत: हाताने सिद्ध करतो. या खेळण्यांमध्ये समर्थ रामदासस्वामी यांच्या जीवनातील काही प्रसंगही आम्ही सिद्ध केले होते.