‘टोल’ चालू करण्यापूर्वीच राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी गज उघडे पडले !

अशा महामार्गाचा टोल नागरिकांनी का भरावा ?

आंदोलनाची चेतावणी देताच ठेकेदाराने खड्डे बुजवले ! – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर

प्रतिकात्मक छायाचित्र

बीड, २० जुलै (वार्ता.) – पाटोदा-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील चुंबळी ते मांजरसुंबा १६६ कोटी रुपये व्यय करून केलेल्या ३३ किलोमीटरच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे  झाल्याने महामार्गावरील लोखंडी गज उघडे पडले आहेत. अद्याप या रस्त्यावर ‘टोल’ही चालू करण्यात आलेला नाही, त्यापूर्वीच महामार्गाची ही दुर्दशा झाली आहे.

रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणी उत्तददायी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच महामार्गाचे काम पूर्ण झाल्याविना टोलआकारणी चालू करण्यात येऊ नये, असे निवेदन जिल्हा प्रशासनाला देऊन सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आंदोलनाची चेतावणीही दिली.

आंदोलनाची चेतावणी दिल्यानंतर १९ जुलै या दिवशी संबंधित अधिकार्‍यांनी ठेकेदारांकडून खड्डे बुजवून घेतले आहेत; मात्र पुढील पावसामुळे तात्पुरते बुजवलेले खड्डे पुन्हा दिसण्याचीच शक्यता अधिक असून त्यामुळे परत लोखंडी गज उघडे पडणार आहेत.

संपादकीय भूमिका

निकृष्ट बांधकाम करणार्‍या ठेकेदारांवर काय कारवाई करणार ते प्रथम अधिकार्‍यांनी सांगायला हवे !