पुणे येथील महाविद्यालयाच्या परिसरामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या देवतांच्या मूर्तींचे विधीवत् विसर्जन !

धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी सांगितले मूर्ती विसर्जनामागील शास्त्र

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – केडगाव येथील ‘सुभाष बाबुराव कुल महाविद्यालया’च्या परिसरामध्ये काही देवतांच्या मूर्ती, वीरगळ (वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो. यास ‘वीरस्तंभ’ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात.) उघड्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या लक्षात आल्यानंतर ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाला नियमित जोडणारे धर्मप्रेमी श्री. राजू गायकवाड, डॉ. नीलेश लोणकर, प्रा. प्रकाश देशमुख यांनी तेथील प्रभारी प्राचार्य श्री. नंदकुमार जाधव यांना संपर्क केला. त्यांना मूर्ती विसर्जनामागील शास्त्र आणि त्या अशा उघड्यावर टाकल्यामुळे होणारी विटंबना, आध्यात्मिकदृष्टया होणारी हानी यांविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी ‘त्या खंडित मूर्ती पुन्हा नदीत विसर्जित करू, केवळ वीरगळी आणि काही इतर शिल्पे संग्रहालयात ठेवू’, असे आश्वासन दिले आणि २-३ दिवसांत त्यांनी त्या मूर्ती नदीत विसर्जित केल्या.

याविषयी प्रभारी प्राचार्य श्री. नंदकुमार जाधव यांनी सांगितले की, त्या मूर्ती नदीतील वाळू काढतांना वाळूतस्करांनी किनार्‍यावर फेकलेल्या होत्या, त्या महाविद्यालयात संग्रहालयात ठेवण्यासाठी आणल्या आहेत.

संपादकीय भूमिका

मूर्ती उघड्यावर आणि अस्ताव्यस्त पडल्याचे लक्षात आल्यावर त्याविषयी त्वरित संबंधितांचे प्रबोधन करणारे धर्माभिमानी आणि त्यानुसार त्वरित कृती करणारे महाविद्यालय प्रशासन यांचे अभिनंदन !