चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील युद्ध यंत्रणा केली अद्ययावत !

२० सहस्र चिनी सैनिकांच्या निवास क्षमतेत ६ पटींनी वाढ !

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी देहली – गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व लडाखमध्ये भारत-चीन यांचे सैन्य समोरासमोर आल्यापासून गेल्या दोन वर्षांत चिनी सैन्याने युद्ध यंत्रणा मोठ्या प्रमाणात अद्ययावत करण्याचे काम केले आहे. वर्ष २०२० मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केवळ २० सहस्र चिनी सैनिकांच्या निवासाची व्यवस्था होती, ती आता १ लाख २० सहस्र सैनिकांपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून पश्‍चिम सेक्टरमधील १०० किमीच्या आत चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने लांब पल्ल्याचा तोफखाना, ‘रॉकेट लाँचिंग’ प्रणाली, हवाई संरक्षण प्रणाली, मोठ्या धावपट्ट्या आणि लढाऊ विमानांसाठीची व्यवस्था निर्माण केली आहे. यासह तेथील पायाभूत सुविधाही अद्ययावत केली आहे’, अशी माहिती एका अधिकृत सूत्राने गुप्तचर माहितीचा संदर्भ देऊन नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

चिनी सैन्याने ‘कॅप्टिव्ह सोलर एनर्जी’ प्रकल्प (ऊर्जा आदी सुविधांसाठी स्वयंपूर्ण असलेल्या सौर ऊर्जेची व्यवस्था), तसेच छोटे जलविद्युत् प्रकल्पही उभारले आहेत, जेे सैन्याची हिवाळ्यातील निर्वाह क्षमता अनेक पटींनी वाढवते.

संपादकीय भूमिका

सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्‍या चीनला त्याच्या समजेल अशा भाषेत भारताने धडा शिकवणे आवश्यक !