संतांनी सांगितलेला सेवाधर्म अंगीकारण्याची सध्याच्या काळात आवश्यकता ! – डॉ. सदानंद मोरे

‘ज्ञानोबा तुकाराम’ या वार्षिक अंकाच्या वतीने वारीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा पत्रकार भवन येथे आयोजित केला होता.

पुणे – संतांनी सांगितलेला सेवाधर्म अंगीकारण्याची सध्याच्या काळात आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. ‘ज्ञानोबा तुकाराम’ या वार्षिक अंकाच्या वतीने वारीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा पत्रकार भवन येथे आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात dnyanbatukaram.com या ‘वेबपोर्टल’चे लोकार्पणही करण्यात आले. कार्यक्रमाला देहू संस्थानचे अध्यक्ष, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख, आळंदी संस्थानचे विश्वस्त, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष, लोकमतचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर आदी मान्यवर उपस्थित होते. ‘ज्ञानोबा तुकाराम’ या विशेषांकाचे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वर्ष १९८२ पासून वारीचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार आनंद चिटणीस, पालखी सोहळा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.