कुडाळ (सिंधुदुर्ग) – कायदेशीररित्या खरेदी केलेल्या भूमीची ७/१२ वर नोंद करण्यासाठी ३ सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी तालुक्यातील तुळसुली तर्फ माणगावचे तलाठी बाळासो शामराव शिंदे यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात २ जून या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रार नोंद झाल्याचे समजताच शिंदे पसार झाले आहेत.
तक्रारदाराने तुळसुली तर्फ माणगाव येथे ५ गुंठे भूमी कायदेशीर खरेदीखताने खरेदी केली. याची ७/१२ च्या अभिलेखात नोंद करण्याकरता खरेदीखताची प्रत तुळसुली तर्फ माणगावच्या तलाठी कार्यालयात ७ जानेवारी २०२२ या दिवशी दिली. १२ मे या दिवशी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात जाऊन तलाठी शिंदे यांच्याकडे ७/१२ वरील नोंदीविषयी चौकशी केली. त्या वेळी तलाठी शिंदे यांनी ७/१२ सिद्ध झाला नसल्याचे सांगून स्वत:साठी १ सहस्र रुपये आणि मंडळ अधिकारी यांच्यासाठी २ सहस्र रुपये, अशी एकूण ३ सहस्र रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई केली.
संपादकीय भूमिकासहस्रो रुपयांचे वेतन आणि अन्य भत्ते असतांना जनतेकडून लाच मागणार्यांवर आतापर्यंत कठोर कारवाई न झाल्याने देश भ्रष्टाचाराने ग्रस्त झाला आहे. देश भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल, तर असे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! |