युक्रेनमध्ये सैन्य पाठवून तिसर्‍या महायुद्धाचा धोका पत्करायचा नाही ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (उजवीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – युक्रेनमध्ये प्रत्यक्ष अमेरिकी सैनिकांना पाठवून तिसर्‍या महायुद्धात सहभागी होण्याचा धोका अमेरिकेला पत्करायचा नाही. त्यामुळे युक्रेनी नागरिकांना स्वत:चे रक्षण स्वतः करता येण्यासाठी अमेरिका शक्य तितके साहाय्य करत आहे, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले. अमेरिका युक्रेनला साडेपाच सहस्र ‘जॅवलीन’ क्षेपणास्त्रे देणार असल्याचेही बायडेन यांनी नमूद केले. अलबामा येथील ट्रोय येथे ‘लॉकहीड मार्टिन’च्या क्षेपणास्त्र प्रकल्पात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रकल्पात ‘जॅवलिन’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची निर्मिती केली जाते.

लोकशाही आणि एकाधिकारशाही यांच्यामध्ये युद्ध चालू !

बायडेन पुढे म्हणाले की, सध्या जगात एकाधिकारशाही आणि लोकशाही यांच्यात युद्ध चालू आहे. ‘२१व्या शतकात लोकशाही तग धरू शकणार नाही’, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले होते. हा विनोद नाही; कारण गोष्टी वेगाने पालटत आहेत. लोकशाहीत सहमती लागते आणि ती मिळवणे अवघड आहे. एकाधिकारशाहीमध्येही सहमती ठेवली जावू शकत नाही. असे झाले, तर संपूर्ण जग पालटेल. आपण इतिहासातील वळणाच्या बिंदूवर आलो आहोत. प्रत्येक ६ किंवा ८ पिढ्यांनंतर ही स्थिती येते. त्यात आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी अत्यंत वेगाने पालटतात.