‘राजा शिवछत्रपती परिवारा’कडून पालघर येथील भवानगडाची स्वच्छता !

मोहिमेत सहभागी झालेले शिवप्रेमी

मुंबई, ४ मे (वार्ता.) – महाराष्ट्रदिनाच्या दिवशी ‘राजा शिवछत्रपती परिवारा’च्या पालघर विभागाकडून पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील भवानगडाची स्वच्छता करण्यात आली. मुंबई, डोंबिवली, नेरूळ, विरार, पालघर, नवी मुंबई आदी विविध ठिकाणांहून १३० शिवप्रेमी या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत ‘आम्ही मावळे स्वराज्याचे’ या संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे युवकांसह लहान मुले, युवती आणि ज्येष्ठ नागरिक यांनीही रणरणत्या उन्हात राहून दिवसभर गडाची स्वच्छता केली.

गडावर जाणाऱ्या पायवाटेची दुरुस्ती करतांना शिवप्रेमी

गडावरील प्लास्टिक आणि अन्य कचरा उचलणे, सुकलेले गवत-झुडपे काढणे, गडावरील ढासळलेल्या बुरुजाची बांधणी आदी कामे या वेळी करण्यात आली. गडावर  असलेल्या लहान गुंफेकडे सहजतेने खाली उतरून जाता यावे, यासाठी मार्गातील पायऱ्यांची मांडणी व्यवस्थित करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांच्या जयघोषात सर्व शिवप्रेमी उत्साहाने या मोहिमेत सहभागी झाले होते. वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबवण्यात आली. ‘राजा शिवछत्रपती परिवारा’च्या पालघर विभागाची ही ४१ वी स्वच्छता मोहीम होती.

देश घडवणारी पिढी सिद्ध करण्याचे काम चालू आहे ! – सुनील सूर्यवंशी, संस्थापक, राजा शिवछत्रपती परिवार

आज देश घडवण्यासाठी चांगल्या विचारांची पिढी घडणे आवश्यक आहे. राजा शिवछत्रपती परिवाराकडून हे काम अविरतपणे चालू आहे. महाराष्ट्रातील विविध २१ जिल्ह्यांमध्ये संस्थेचे कार्य चालू आहे. ज्या जिल्ह्यात गडदुर्ग नाहीत, तेथे पूरग्रस्थांना साहाय्य, वृद्धाश्रमामध्ये कपडे आणि फळ वाटप, गरीब शेतकरी आणि विद्यार्थी यांना आर्थिक साहाय्य, वृक्षारोपण आदी सामाजिक कार्य परिवाराच्या वतीने करण्यात येते, अशी माहिती राजा शिवछत्रपती परिवार संस्थेचे संस्थापक श्री. सुनील सूर्यवंशी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

राजा शिवछत्रपती परिवाराविषयी…

शिवप्रेमी युवकांनी एकत्र येऊन ३१ जुलै २०१४ या दिवशी राजा शिवछत्रपती संघटनेची स्थापना केली. जात, पक्ष, संप्रदाय आदी भेद बाजूला सारून ‘स्वराज्याचा मावळा’ म्हणून आणि कौटुंबिक भावनेतून संघटकडून कार्य केले जाते. विशेष म्हणजे हे सर्व कार्य ही शिवप्रेमीमंडळी स्वखर्चातून करतात.

संपादकीय भूमिका 

गडदुर्गांच्या स्वच्छतेचा शिवप्रेमींचा अभिनंदनीय उपक्रम !