सोलापूर, ४ मे (वार्ता.) – महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमधील ध्वनीक्षेपकाची अनुमती शासनाने एकच आदेश काढून घोषित करावी. प्रत्येक मंदिराला वेगवेगळी संमती घेण्यासाठी भाग पाडू नये, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना संगणकीय पत्राद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
१. मंदिरातील ध्वनीक्षेपकाला अनुमती मिळण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची अनुमती आवश्यक करण्यात आली आहे, तर मशिदींवरील भोंग्यांच्या अनुमतीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची अनुमती सक्तीची नसून त्यांना ‘वक्फ बोर्डा’चे प्रमाणपत्र देण्यास सांगितले आहे. त्यामुळे मंदिरांसाठीही धर्मादाय आयुक्त कार्यालयाची अनुमती आवश्यक न करता, शासन नियुक्त मंदिर समितीचे किंवा वारकरी संघटनांचे प्रमाणपत्र मान्य करावे. मंदिर आणि मशीद यांना समान नियम असावेत.
२. कीर्तन हे केवळ पूजापाठ, नित्यनेम विधी नसून समाज घडवण्याचे श्रेष्ठ माध्यम आहे. समाज मनावर संस्कार करून त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न कीर्तन परंपरा करत आहे. समाजाला दिशा देण्याचे मोलाचे कार्य या परंपरेकडून पिढ्यान्पिढ्या घडत आहे. त्यामुळे कीर्तनाकडे पहातांना समाज उपयोगी प्रभावी आणि सर्वमान्य माध्यम आहे, असे पहावे. त्यामुळे प्रत्येक मंदिराने स्वतंत्र अनुमती काढण्याऐवजी महाराष्ट्र शासनाने सामाजिक आवश्यकता म्हणून सर्वांना एकच अनुमती घोषित करावी.