डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
पू. किरण फाटक हे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. त्यांचे वडील श्री. भास्करराव फाटक हे घरी संगीताच्या शिकवण्या घेत होते. त्यामुळे पू. किरण फाटक संगीताच्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले. पुढे त्यांनी बांद्रा (मुंबई) येथील स्व. इंदिराबाई केळकर आणि त्यानंतर पुणे येथील श्री. विकास कशाळकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.
पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत. आतापर्यंत त्यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी ‘संगीत’ या विषयावर विविध ग्रंथांचे लिखाणही केले आहे. ६.१.२०२० या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. किरण फाटक यांनी संतपद (७१ टक्के आध्यात्मिक पातळी) गाठल्याचे घोषित केले.
‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.३.२०२२)
१. गाण्यातून आनंद मिळण्यासाठी दीर्घकालीन तपःश्चर्या करावी लागणे
‘गायन, वादन आणि नृत्य या सादरीकरणाच्या कला आहेत. बरेच विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे शिकायला यायचे, तेव्हा ते सांगत, ‘‘सर, आम्हाला कुठे चार लोकांत गायचे आहे ? आम्हाला कुठे मैफिली करायच्या आहेत ?’’ त्या वेळी त्यांचे हे अज्ञानमूलक बोलणे ऐकून मला पुष्कळ आश्चर्य वाटत असे आणि खेदही होई. ते पुढे म्हणत, ‘‘आम्ही आमच्या आनंदासाठी गाणे शिकणार आहोत.’’ तेव्हा मी मनात म्हणत असे, ‘अहो, आनंद मिळण्यासाठी दीर्घकालीन तपःश्चर्या करावी लागते. सर्वस्व पणाला लावावे लागते. तेव्हा कुठे आनंदाची चाहूल लागते’; पण समजावून सांगणार कोण ? ‘अज्ञानात आनंद असतो’, असे म्हणतात.
२. ‘स्वतःला कसे गाता येते ?’, हे स्वतःच ओळखणे आवश्यक असणे
‘स्वतःला किती छान गाता येते ?’, हे आपण स्वतः ओळखले पाहिजे. ‘हा गाणे शिकत आहे,’ असे लोकांना कळले की, ते लगेच ‘कार्यक्रम करा’, असे सांगतात. ‘आमच्या घरी पूजा आहे. तेव्हा एक घंट्याभराचा भक्तीगीतांचा कार्यक्रम करा’, असा आग्रह लोक नवशिक्या गाण्याच्या विद्यार्थ्याला करतात. तोही हुरळून जातो. तोडक्या-मोडक्या स्वर-तालांत तो कार्यक्रम सादर करतो. त्या वेळी बरेच लोक आपापसांत गप्पा मारत असतात. काही लोक गायकाचे उगाचच कौतुक करतात. बोलावणाऱ्याचा उत्सव फुकटात साजरा होतो. ‘ठीक गायली गाणी ! आम्हाला कुठे पट्टीचा गायक हवा होता ? वेळ मारून नेली, झाले !’, असे उद्गार बोलावता धनी काढतो.
३. गुरूंनी अनुमती दिल्याविना लोकांसमोर कला सादर करू नये !
‘असे कार्यक्रम करावे का ? १०० टक्के सिद्धता नसतांना चार लोकात गावे का ?’, याचा अंदाज गाणे शिकणाऱ्याला यायला हवा. लोकांच्या धूर्त आग्रहाला बळी पडू नये. हेच लोक नंतर निंदा करतात. ते म्हणतात, ‘‘ना सूर ना ताल आणि हा बेसूर-बेताल गायला तयार !’’ गुरूंनी अनुमती दिल्याविना लोकांसमोर कला सादर करू नये.
४. गायन कुठे सादर करावे ?
जेथे ‘धन’, ‘यथोचित मान’ आणि ‘श्रोतृगण’ दिला जातो, तेथेच गायनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारावे, तसेच जेथे पुरेसे श्रोते नसतात, तेथे गायला कधीच जाऊ नये. बरीच भजनी मंडळे वेगवेगळ्या सार्वजनिक उत्सवांत मोठमोठ्या रंगमंचावर बसून अगदी रेटून कार्यक्रम करतात; पण ऐकायला एकही श्रोता नसतो. मंडपात ४ – ५ मुले खेळत असतात; पण मानधन मिळण्यासाठी ते पूर्णवेळ कार्यक्रम करतात. असे होऊ नये. ‘हा कला आणि कलाकार यांचा अपमान आहे’, असे मला वाटते. ‘श्रोतृगण जमवणे’, हे आयोजकांचे काम असते. ते काम जर जमत नसेल, तर कार्यक्रम तरी कशासाठी ठेवावेत ?
५. गायन सादर करण्याचे ठिकाण लक्षात घेऊन ‘कोणती गाणी सादर करायची ?’, हे ठरवणे आवश्यक असणे
आता ‘कुठे आणि काय गावे ?’, याचाही विचार करावा. ‘आपण कुठे गात आहोत ? तेथील श्रोत्यांची आवड काय आहे ?’,हे कार्यक्रमापूर्वी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एखाद्या धार्मिक उत्सवाचा कार्यक्रम जर एखाद्या प्रार्थनास्थळी असेल, तर तेथे शक्यतो त्या देवाची भक्तीगीते गावीत. तेथे शृंगारगीते टाळावीत; परंतु हा अलिखित नियम आजकाल कुणी पाळतांना दिसत नाही.
आजकाल सत्यनारायण पूजेच्या वेळी शृंगारिक चित्रपटगीते सर्रास सादर केली जातात आणि त्या गीतांची मागणीही होते. तेथील लोक त्या गाण्यांवर वेडेवाकडे नाचतातही ! हे मी स्वतः अनुभवले आहे. मी त्या वेळी कार्यक्रम थांबवला होता. हे थांबवणे केवळ कलाकाराच्या हातात असते; परंतु ‘बक्कळ मानधनापुढे त्यांना नैतिक मूल्यांचे महत्त्व विशेष वाटत नसावे’, असे मला वाटते.
कार्यक्रम जर श्री गणपतीच्या देवळात असेल, तर तेथे महादेवाची गाणी गाऊ नयेत. कार्यक्रम विठ्ठलाच्या देवळात असेल, तर तेथे इतर देवांची गाणी शक्यतो गाऊ नयेत; कारण ऐकायला आलेले भक्त हे विठ्ठलाचे भक्त असतात. त्यांच्या मनात विठ्ठलाविषयी श्रद्धा आणि भक्ती असते. त्यांना विठ्ठलाची गाणी ऐकण्यात जास्त रस असतो. असे न झाल्यास त्यांचा रसभंग होण्याचा संभव असतो.
६. दिलेल्या वेळेत आपले गायन बसवण्याचे कौशल्य आवश्यक असणे
संयोजकांनी जितका वेळ दिलेला आहे, तेवढा वेळच गावे. ‘तेवढ्या वेळात आपले गायन बसवता येणे’, हे कौशल्याचे काम असते. ते जमायला हवे. तेवढ्या वेळात आपल्या गायनात रंग भरता आला पाहिजे. समोरच्या श्रोत्यांकडे लक्ष हवे. ते जर कंटाळलेले वाटले, तर आपले गायन त्यांच्यावर न लादता ते आटोपते घेण्याची मानसिकता असणे आवश्यक आहे.
७. ‘कलाकाराला चांगला रसिक श्रोता मिळणे’, हा मोठा योग असणे आणि त्यामुळे कलाकाराला यश अन् प्रसिद्धी यांची प्राप्ती होणे
ज्या लोकांना गायन आवडत नाही किंवा जे गायनाला नाके मुरडतात, त्यांच्यासमोर कधीही गाऊ नये किंवा त्यांना गायनाचे महत्त्व सांगू नये. ते गायन अस्थानी होईल. ‘कलाकाराला चांगला रसिक श्रोता मिळणे’, हा मोठा योगायोग असतो. प्रत्येक कलाकाराचे श्रोते जन्माला आलेले असतात; पण ‘ते कलाकाराला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी भेटणे’, हा कलाकाराच्या जीवनातला एक दिव्य योग असतो. हा योग कलाकाराला यश आणि प्रसिद्धी यांच्या शिखरावर नेऊन ठेवतो; अन्यथा तो दुर्लक्षित रहातो; म्हणून कलाकाराला ‘कुठे, किती आणि कसे गायचे ?’, हे कळले पाहिजे, म्हणजे तो कलाविश्वात यशस्वी होतो.’
– (पू.) श्री. किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२६.६.२०२१)