स्वतः काढलेल्या सुबक चित्रांच्या माध्यमांतून त्यांचे पणतू आणि सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम (वय ४ वर्षे) यांना विविध गोष्टींची शिकवण देणाऱ्या पू. (श्रीमती) राधा प्रभु !

मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. राधा प्रभु (वय ८४ वर्षे) यांनी त्यांचे पणतू आणि सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांच्यासाठी स्वतः काही कथा तयार केल्या आहेत. एका वहीत त्यांनी निर्जीव वस्तू, झाडे, फुले, प्राणी-पक्षी आदींची सुंदर अन् सुबक चित्रे काढली आहेत. पू. भार्गवराम यांना विविध गोष्टींचे ज्ञान व्हावे, यासाठी पू. राधा प्रभुआजी (पू. भार्गवराम यांची पणजी)  या चित्रांच्या माध्यमातून अनेक स्वरचित कथा पू. भार्गवराम (त्या वेळचे (वर्ष २०१९ मधील) वय २ वर्षे) यांना समजावून सांगायच्या. यामुळे पू. भार्गवराम यांच्या मनात निसर्ग, प्राणी-पक्षी, फुले इत्यादी अनेक गोष्टींची जिज्ञासा निर्माण होऊन त्यांना अनेक विषयांचे ज्ञानही मिळू लागले. यातून ‘एक संत दुसऱ्या संतांकडे ज्ञानाचा अमूल्य ठेवा कसा सुपुर्द करतात ? आणि सुसंस्कारांचे बाळकडूही कसे देतात ?’, हे शिकायला मिळते. पू. राधा प्रभु यांनी चित्रांतून सात्त्विक आणि असात्त्विक गोष्टींविषयीची शिकवणही दिली आहे. त्यांनी काढलेल्या या चित्रांकडे पाहून भावजागृती होते आणि वही हातात घेतल्यावर ध्यान लागते.

ही चित्रे बारकाईने पाहून त्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या पू. भार्गवराम यांची बुद्धीमत्ता लक्षात येते, तसेच प्रत्येक गोष्टीमागील कारण जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासू वृत्तीही दिसून येते. वहीतील असात्त्विक गोष्टी आणि वस्तू यांच्या चित्रांवर त्यांनी रेघोट्या मारल्या आहेत किंवा ते चित्रच फाडून टाकले आहे.

पू. राधा प्रभु यांनी काढलेली चित्रे आणि ती पहातांना पू. भार्गवराम अन् पू. राधा प्रभु यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.


पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी
पू. भार्गवराम भरत प्रभु

१. हंस आणि सारस पक्ष्यांच्या माध्यमातून शिकवणे (छायाचित्र क्र. १ पहावे)

छायाचित्र क्र. १

चित्र काढलेला दिनांक : ८.५.२०१९

चित्राचे वर्णन : या चित्रात एक हंस पक्षी आणि एक सारस पक्षी असून लांब चोच असलेला सारस पक्षी पाण्यातील मासे पकडून खात आहे. चित्रात आणखी २ मासेही दाखवले आहेत.

पू. भार्गवराम प्रभु : हे काय आहे ?

पू. राधा प्रभु : हा हंस पक्षी आणि हा सारस पक्षी आहे. हा पाण्यातील मासे पकडून खातो.

पू. भार्गवराम : या पक्ष्याचे तोंड कुठे आहे ?

पू. राधा प्रभु : त्याला लांब चोच आहे ना, तेच त्याचे तोंड आहे.

पू. भार्गवराम : मला अशी चोच नाही.

पू. राधा प्रभु : माणसाला चोच नसते, तर तोंड असते. मनुष्य तोंडाने खातो.

पू. भार्गवराम : तेथे आणखी २ मासे आहेत. ते कुणासाठी आहेत ?

पू. राधा प्रभु : ते हंस पक्ष्यासाठी आहेत.

२. पू. राधा प्रभु यांनी ‘बटू’च्या चित्राच्या माध्यमातून पू. भार्गवराम यांच्या मनाची त्यांचे केस कापून शेंडी ठेवण्याविषयी करून घेतलेली सिद्धता ! (छायाचित्र क्र. २ पहावे)

छायाचित्र क्र. २

चित्र काढलेला दिनांक : १३.५.२०१९

पू. राधा प्रभु : हा मुंज झालेला बटू आहे.

पू. भार्गवराम : तो कुणाला नमस्कार करत आहे ?

पू. राधा प्रभु : तो तेथे असलेल्या सर्व मोठ्या व्यक्तींना नमस्कार करत आहे.

पू. भार्गवराम : त्याच्या डोक्यावर काय आहे ?

पू. राधा प्रभु : ती शेंडी आहे. त्याचे सर्व केस कापून ही शेंडी ठेवली आहे. काही दिवसांनी आपण सर्व जण रामनाथी आश्रमात जाणार आहोत. आश्रमात तुझे केस कापून केवळ शेंडी ठेवायची आहे. तेव्हा तू रडणार का ?

पू. भार्गवराम : नाही. मी रडणार नाही.

३. पिसारा फुलवून नाचणारा सुंदर मोर ! (छायाचित्र क्र. ३ पहावे)

छायाचित्र क्र. ३

चित्र काढलेला दिनांक : १४.५.२०१९

पू. भार्गवराम : हा मोर पिसारा फुलवून नाचत आहे.

४. चित्राद्वारे वन्य जीवनाची ओळख आणि मोराचे सुंदर चित्र पाहिल्यावर पू. भार्गवराम यांनी मोराचा नाच पहाण्याची व्यक्त केलेली इच्छा !

चित्र काढलेला दिनांक : १४.५.२०१९

चित्राचे वर्णन : या चित्रात राना-वनात रहाणाऱ्या लोकांच्या झोपड्या दाखवल्या असून झोपडीसमोर दोन मोर आहेत.

पू. भार्गवराम : पणजी, हे कुणाचे घर (झोपडी) आहे ?

पू. राधा प्रभु : या झोपड्या राना-वनात रहाणाऱ्या लोकांच्या आहेत.

पू. भार्गवराम : त्या झोपड्यांसमोर कोणते पक्षी आणि प्राणी आहेत ?

पू. राधा प्रभु : तेथे २ मोर आहेत.

पू. भार्गवराम : मोरांचे पीस छान असते. श्रीकृष्णाच्या मुकुटात मोरपीस असते ना ?

पू. राधा प्रभु : हो. मोर पिसारा फुलवून नृत्य करतो.

पू. भार्गवराम : ‘मला त्यांचा नाच पहावा’, असे वाटते.

पू. राधा प्रभु : नंतर केव्हातरी तुला त्यांचा नाच पहायला मिळेल.