गृह, वित्त खाते मुख्यमंत्र्यांकडेच, तर विश्वजीत राणे यांना ५ महत्त्वाची खाती
पणजी, ३ एप्रिल (वार्ता.) – शपथविधी कार्यक्रमानंतर अखेर ६ दिवसांनी खातेवाटप करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृह आणि वित्त ही महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहेत, तर मंत्रीमंडळातील दुसर्या क्रमांकावर असलेले विश्वजीत राणे यांना ५ महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३ एप्रिल या दिवशी खातेवाटपाची सूची राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांना पाठवली आणि राज्यपालांच्या संमतीनंतर सर्वसाधारण प्रशासन विभागाचे अवर सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी खातेवाटपाची अधिसूचना प्रसिद्ध केली. खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.
- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत – गृह, वित्त, दक्षता आणि राजभाषा
- विश्वजीत राणे – आरोग्य, नगरनियोजन, नगरविकास, महिला आणि बालकल्याण आणि वन (मागील सरकारमध्ये विश्वजीत राणे यांच्याकडे आरोग्य आणि महिला आणि बालकल्याण ही खाती होती)
- माविन गुदिन्हो – पंचायत, वाहतूक, शिष्टाचार आणि उद्योग
- नीलेश काब्राल – सार्वजनिक बांधकाम खाते, पर्यावरण, कायदा
- रोहन खंवटे – पर्यटन, माहिती-तंत्रज्ञान आणि प्रिटिंग-स्टेशनरी
- बाबूश मोन्सेरात – महसूल, मजूर आणि कचरा व्यवस्थापन (मागील मंत्रिमंडळात बाबूश मोन्सेरात यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे महसूल आणि मजूर ही खाती होती)
- गोविंद गावडे – कला आणि संस्कृती, क्रीडा आणि ग्रामविकास
- रवी नाईक – कृषी, नागरी पुरवठा आणि हस्तकला
- सुभाष शिरोडकर – जलस्रोत, सहकार आणि प्रोव्हेदोरिया (लोकपाल)
सौजन्य – Herald TV
शिक्षण आणि वीज खाती मुख्यमंत्र्यांकडेच
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे गृह, वित्त, दक्षता आणि राजभाषा या खात्याबरोबरच अद्याप वाटप न झालेली शिक्षण, वीज आणि इतर खाती रहाणार आहेत. अजून तिघांचा मंत्रीमंडळात समावेश व्हायचा आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांकडील काही खाती या नवीन मंत्र्यांकडे जाणार आहे. आता सर्वांचे लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागले आहे.
मंत्रीमंडळ विस्तार पुढील आठवड्यात ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
मंत्रीमंडळातील अन्य मंत्र्यांची निवड करून पुढील आठवड्यापर्यंत त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. मंत्रीमंडळातील प्रत्येक सदस्याला वैयक्तिक स्तरावर भेटून मी त्यांच्याशी योजनांची अंमलबजावणी, केंद्रीय योजनांचा लाभ घेणे आणि प्रलंबित प्रश्न हाताळणे यांविषयी चर्चा करणार आहे. मंत्रीमंडळातील सर्व सदस्य अनुभवी आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खातेवाटपानंतर केले.