पुण्यातील ‘डीटीडीसी’ कुरिअर कार्यालयात आले लुधियानाहून घातक शस्त्रांचे पार्सल !

राज्यात तलवारींचे पार्सल मिळण्याच्या घटना वारंवार घडणे चिंताजनक आहे. पोलिसांनी तत्परतेने यामागे कुणाचा हात आहे, हे शोधूण काढणे आवश्यक आहे. – संपादक

पुणे – येथील ‘डीटीडीसी’ आस्थापनाच्या कुरिअर सेवेद्वारे १ एप्रिल या दिवशी ३ धारदार तलवारी पार्सल म्हणून आल्या आहेत. कुरिअर कर्मचाऱ्यांना पार्सलविषयी शंका आल्याने त्यांनी स्वारगेट पोलिसांना फोन केला. लुधियानाहून या तलवारी कुणीतरी पार्सल केल्या असून या तलवारी ज्याच्या नावे आल्या त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांनी दिली आहे. ३० मार्च या दिवशी संभाजीनगरमध्ये एकाचवेळी कुरियरने ३७ तलवारी शहरात मागवण्यात आल्या होत्या, तसेच पुण्यात इन्स्टाग्रामद्वारे हत्यारे मागवल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी अधिवेशनात दिली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात कुरिअरमध्ये तलवारी आढळून आल्याने याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.