कॅनडामध्ये ‘स्वस्तिक’वर नाही, तर ‘नाझी हुक्ड क्रॉस’वर बंदी येणार !

हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम !

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या खासगी विधेयकामध्ये आता पालट करण्यात येणार आहे. या विधेयकामध्ये ‘स्वस्तिक’ ऐवजी ‘नाझी हुक्ड क्रॉस’ या शब्दाचा वापर करण्यात येणार आहे. कॅनडाच्या संसदेने या पालटाला संमती दिली आहे. कॅनडातील न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे खासदार पीटर जुलियन यांनी याविषयीची माहिती दिली आहे. कॅनडा आणि जगभरातील हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर हा पालट करण्यात आला आहे. हिंदू फेडरेशन नावाच्या संघटनेने कॅनडामध्ये निदर्शनेही केली होती.

१.  हे विधेयक संमत झाल्यानंतर कॅनडामध्ये ‘नाझी हुक्ड क्रॉस’ची विक्री आणि प्रदर्शन करण्यावर बंदी येणार आहे. काही आठवड्यांपूर्वी कॅनडाची राजधानी ओटावा येथे ट्रकचालकांनी केलेल्या आंदोलनामध्ये नाझी क्रॉसचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर हे विधेयक मांडण्यात आले होते.

२. खासदार पीटर जुलियन म्हणाले, ‘‘मला ठाऊक आहे की, स्वस्तिकचे हिंदु, बौद्ध आणि धर्मांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. आम्ही या विधेयकामध्ये स्वास्तिक चिन्हाच्या धार्मिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक उपयोगावर कोणतीही बंदी घालण्याची मागणी करणार नाही.’’

३. लिबरल पार्टीचे खासदार चंद्र आर्य यांनी संसदेत बोलतांना म्हटले होते की, स्वस्तिकवर बंदी आणण्याच्या या विधेयकाविषयी हिंदूंमध्ये संताप आहे. हिंदूंच्या स्वस्तिकचा अर्थ पवित्र चिन्ह आहे. ते आणि नाझी हुक्ड क्रॉस हे वेगवेगळे आहेत. त्याला स्वस्तिक चिन्ह म्हणणे चुकीचे आहे.