‘२.१०.२०२१ या दिवशी सनातनचे संत उपस्थित असणार्या एका सत्संगात साधकांकडून एक प्रयोग करवून घेतला. या प्रयोगामध्ये श्री. लक्ष्मण गोरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला गोरे यांना पुढे बोलवण्यात आले अन् सर्व साधकांनी ‘त्यांना पाहून काय जाणवते ?’ हे सांगण्यास सांगितले. या प्रयोगामध्ये पू. लक्ष्मण गोरे (वय ८० वर्षे) आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला गोरे (वय ७२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना पाहिल्यावर मला पुढील सूत्रे जाणवली.
१. श्री. लक्ष्मण गोरे
अ. यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवंत यांच्याप्रती बालकभाव असल्याचे जाणवते. ‘ते दिवसभर बालकभावात रहातात’, असे जाणवले.
आ. त्यांच्यामध्ये हिंदु धर्माप्रती पुष्कळ आदर आणि अभिमान आहे. त्यांच्यामध्ये धर्मरक्षण करण्याची तीव्र तळमळ आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात क्षात्रतेज जाणवते.
इ. त्यांचे मन जरी बाल्यावस्थेत असले, तरी त्यांची बुद्धी धर्मनिष्ठ आहे. त्यामुळे ते ‘पृथ्वीवर लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन होऊ दे’, अशी ‘देवाच्या चरणी शरणागभावाने आणि आर्तभावाने प्रार्थना करतात’, असे जाणवले.
ई. त्यांचा अहं अत्यंत न्यून असून त्यांच्यामध्ये पुष्कळ विनम्रता आहे.
उ. त्यांचे भगवंताशी अखंड अनुसंधान चालू आहे. ते परात्पर गुरूंचे समष्टी रूप असलेल्या श्रीकृष्णाशी एकरूप झाल्याचे जाणवते.
ऊ. त्यांच्याकडे पाहून भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती एकाच वेळी येते. एखाद्या साधकामध्ये एक किंवा अधिकाधिक दोन घटक जाणवतात; परंतु गोरेकाकांकडे पाहिल्यावर वरील चारही घटकांची अनुभूती एकाच वेळी येते. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
ए. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या ठिकाणी पिवळसर सोनेरी रंगाचे कवच निर्माण झाल्याचे जाणवते. हे कवच म्हणजे ‘त्यांच्या भोवती असणारे जनलोकातील वायूमंडल आहे’, असे जाणवते.
ऐ. काही मासांपूर्वी जेव्हा ते रामनाथी आश्रमात आले होते, तेव्हा त्यांना पाहिल्यावर मला आनंद आणि शांती यांची अनुभूती आली.
ओ. ते घरात राहूनही सतत भगवंताच्या अनुसंधानात राहून समष्टीच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात.
औ. ‘त्यांच्यासारख्या भक्तांनी समष्टी भक्ती केल्यामुळे या भूतलावर हिंदु राष्ट्र लवकर स्थापन होणार आहे’, असे जाणवते.
२. सौ. मंगला गोरे
अ. त्यांच्याकडे पाहिल्यावर असे जाणवते की, ‘त्यांचा अखंड नामजप चालू आहे.’ त्यामुळे त्यांना पाहून माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप आपोआप चालू झाला.
आ. त्यांच्या हृदयात बाळकृष्णाचे दर्शन झाले आणि ‘त्या हृदयातील बाळकृष्णाला भक्तीचे लोणी प्रेमाने भरवत आहेत’, असे दृश्य दिसले. हे दृश्य पाहून माझी भावजागृती झाली.
इ. सौ. गोरेकाकू साधकांमध्येही परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांचे रूप पाहून त्यांच्यावर प्रीती करतात. त्यामुळे त्यांच्या हृदयात भक्तीसागरासह प्रीतीचाही सागर असल्याचे जाणवते आणि या लाटा साधकांपर्यंत पोचून ‘साधकांमध्येही भक्ती आणि प्रीती यांचे तरंग उमटतात’, असे जाणवले.
ई. सौ. गोरेकाकूही कर्मयोगी आहेत ; परंतु त्यांच्या कर्मयोगाला भक्तीयोगाची जोड मिळाल्यामुळे त्यांचा कर्मयोग भावमय झालेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे पुष्कळ ज्ञानही आहे. त्यामुळे त्यांचा कर्मयोग ज्ञानाने परिपूर्ण झालेला आहे.
उ. त्यांच्याकडे पाहून भाव, प्रीती, चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती येते.
ऊ. त्यांच्या ठिकाणी मला अन्नपूर्णादेवीचे दर्शन झाले.
ए. काही मासांपूर्वी सौ. गोरेकाकूंची ६१ टक्के पातळी घोषित झाल्यावर त्यांच्या संदर्भात त्यांच्या मुलींनी लिहिलेला लेख दैनिकात आला होता. या लेखात दिल्याप्रमाणे त्यांची गुणवैशिष्ट्ये वाचल्यावर ‘ही सर्व गुणवैशिष्ट्ये म्हणजे संतांची लक्षणे आहेत’, आणि ‘त्या लवकर संतपद प्राप्त करतील’, असे मला जाणवले.
ऐ. सौ. गोरेकाकू यांच्या भोवतीही जनलोकाचे वातावरण निर्माण झालेले असून ‘त्या संत झाल्या आहेत आणि याची घोषणा परात्पर गुरु डॉ. आठवले कधीही करू शकतात’, असे जाणवले.
कृतज्ञता : ‘हे ईश्वरा, तुझ्या कृपेमुळे मला श्री. लक्ष्मण गोरेकाका आणि सौ. मंगला गोरेकाकू यांची गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली अन् त्यांच्या संदर्भात विविध अनुभूती आल्या. यासाठी मी आपल्या सुकोमल चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान,आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०२१) (ही सूत्रे पू. लक्ष्मण गोरे संत होण्यापूर्वीची असल्याने त्यांचा उल्लेख येथे ‘श्री. लक्ष्मण गोरे’ असा केला आहे)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |