१७.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आलेली अनुभूती

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पूजा करतांना श्री गुरूंसाठी म्हणायचा गायत्री मंत्र आतून स्फुरणे

श्री. कौशल दामले

‘१७.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा वाढदिवस होता. त्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे देवपूजा करण्यासाठी बसलो होतो. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘आपण एकादशीला भगवान विष्णूला २४ तुळशीपत्रे वहातो, त्याची वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्रे म्हणून पूजा करतो, तशी श्री गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) पूजा करूया.’ त्या वेळी मी विष्णुस्वरूप गुरूंची पूजा करण्याचा संकल्प केला. नंतर सर्व सिद्धता करून मी पूजेला आरंभ केला. ‘आपण एकादशीला महाविष्णूची पूजा करतांना श्रीविष्णूचा मंत्र म्हणतो, तसा श्रीविष्णुस्वरूप गुरूंची पूजा करतांना कोणता मंत्र म्हणायचा ?’, असा विचार करतांना मला श्री गुरूंसाठी म्हणायचा गायत्री मंत्र आतून स्फुरला.

‘ॐ नारायणाय विद्महे दिव्यरूपाय धीमहि । तन्नो जयन्तः प्रचोदयात् ।’

अर्थ : आम्ही नारायणाला जाणतो. त्या दिव्य रूपाचे आम्ही ध्यान करतो. तो श्रीजयंत आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

२. गायत्रीचा अर्थ

‘तद्यत्प्राणांस्त्रायते तस्माद् गायत्री ।’

– बृहदारण्यकोपनिषद्, अध्याय ५,
ब्राह्मण १४, वाक्य ४

अर्थ : ज्यामुळे प्राणांचे रक्षण होते, ती गायत्री आहे.’

३. वरील मंत्र म्हणतांना आलेल्या अनुभूती

अ. हा मंत्र म्हणतांना काही कालावधीपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थ्यांकडे गायत्री मंत्राच्या संदर्भात विचारणा केल्याचे मला आठवले.

आ. गायत्री मंत्र म्हणतांना माझ्या मनाला पुष्कळ शांत आणि प्रसन्न वाटत होते.

४. आता मी प्रत्येक एकादशीला हा गायत्री मंत्र म्हणून महाविष्णुस्वरूप श्री गुरूंची पूजा करतो.’

– श्री. कौशल दामले, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२.६.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक