रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्री भवानीमातेच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी आलेल्या अनुभूती

वस्त्रालंकारांनी सजवलेली श्री भवानीदेवीची मूर्ती

१. ‘श्री भवानीदेवीचे आगमनाविषयी कळल्यावर देवीची सेवा करण्याची संधी मिळेल’, असा  विचार येणे अन् सेवा मिळाल्याने ‘देवीला मनातले सर्व कळते’, याची अनुभूती येणे

श्री. संकेत भोवर

‘रामनाथी आश्रमात भवानीमातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे’, असे कळल्यावर सर्व साधकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. ‘श्री भवानीदेवीचे आगमन होणार आहे’, असे कळल्यावर ‘आता देवीच्या आगमनाच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’चा वेगळा रंगीत अंक निघेल आणि मला सेवा करण्याची संधी मिळेल’, असा विचार माझ्या मनात आला. मला त्या अंकात विज्ञापने सिद्ध करण्याची सेवा करण्याची संधी मिळाली. यासाठी मला कृतज्ञता वाटली. ‘देवीला मनातले सर्व कळते’, याची मला अनुभूती आली. प्रत्यक्ष देवीनेच माझ्या मनातील इच्छा पूर्ण केल्याने देवीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून देवीच सर्व विधी करत आहे’, असे जाणवणे

२१.१.२०२० या दिवशी भवानीमातेच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा होता. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीचे पूजन करण्यासाठी बसल्या होत्या. त्या वेळी ‘साक्षात् देवीच देवीच्या मूर्तीसमोर बसली आहे’, असे मला वाटत होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई प्रतिष्ठापना करतांना देवीच्या प्रत्येक अवयवावर दर्भ लावत होत्या. त्या वेळी ‘साक्षात् देवीच आपले तत्त्व मूर्तीमध्ये प्रक्षेपित करत आहे’, असे मला वाटले. ‘तेथे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई नसून त्यांच्या माध्यमातून देवीच आहे आणि सर्व विधी देवीच करत आहे’, असे मला वाटले.

३. प्रतिष्ठापनेचा विधी करतांना भवानीमातेच्या मूर्तीमध्ये पुष्कळ जिवंतपणा आल्याचे जाणवले. ‘स्वतः देवीच सगुण रूपात आली आहे’, असे मला वाटले.

४. आरतीच्या वेळी उपस्थित रहाता न येणे आणि सहसाधकाने आरती करतांना आलेले अनुभव सांगितल्यावर ‘स्वतःही आरतीत सहभागी झालो आहे’, असे जाणवणे

संध्याकाळी आरतीच्या वेळी मी सेवेमुळे आरतीला जाऊ शकलो नाही. त्या वेळी मला एका साधकाने देवीची आरती करतांना आलेले अनुभव सांगितले. तेव्हा ‘मीसुद्धा आरतीमध्ये सहभागी झालो आहे’, असे मला वाटले.

५. सूक्ष्मातून भावप्रयोग करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देवीसमोर कृतज्ञताभावात उभे राहून ‘सर्व साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती करवून घे’, असे तिला सांगितल्याचे साधकाला दिसणे, ते पाहून साधकाचा कृतज्ञताभाव दाटून येणे

मी पुढीलप्रमाणे सूक्ष्मातून भावप्रयोग केला, ‘मी आरतीसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेलो आहे. तेथे देवीसमोर परात्पर गुरु डॉक्टर उभे आहेत. त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू येत आहेत. ते देवीला सांगत आहेत, ‘हे भवानीदेवी, तू आश्रमात सर्व साधकांचा उद्धार करण्यासाठी आली आहेस. तू आल्याने हिंदु राष्ट्र स्थापण्याचा मार्ग सोपा झाला आहे. तुझ्या येण्याने हिंदु राष्ट्र होण्याचे कार्य अधिक सोपे झाले आहे. तूच आता सर्व साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती करवून घे.’ त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत आणि मी ते अश्रू एका पात्रामध्ये गोळा करत आहे. ते पात्र भरल्यावर मी ते पाणी देवीच्या चरणांवर घालत आहे.’ तेव्हा माझा कृतज्ञताभाव दाटून आला. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांचा कृतज्ञताभाव पाहून ‘आपण कृतज्ञताभावात रहायला किती न्यून पडतो ?’, असे मला वाटले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.

हे सर्व भवानीदेवी आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यामुळेच अनुभवता आले. त्यामुळे त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२०)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.