|
काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांशी युती करण्यासाठी सिद्ध ! – दिनेश गुंडू राव, काँग्रेसचे गोवा प्रभारी
पणजी – काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांशी युती करण्यासाठी सिद्ध असे, अशी माहिती काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी दिली. ते पुढे म्हणाले,‘‘काँग्रेस पक्षातून अन्य पक्षात गेलेल्यांसाठी पक्षाची दारे कायमची बंद करण्यात आली आहेत. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार अजून निश्चित केलेला नाही. काँग्रेस पक्ष वर्ष २०१७ मध्ये केलेली चूक पुन्हा
करणार नाही.’’
नावेलीचे माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश !
पणजी – माजी मंत्री आणि नावेलीचे माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांनी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या उपस्थितीत २८ सप्टेंबर या दिवशी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आवेर्तान फुर्तादो यांनी वर्ष २०१७ मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि लुईझिन फालेरो यांनी त्यांना निवडणुकीत हरवले होते.
पणजीचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचे मन वळवण्यात काँग्रेसला यश
पणजी – काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पणजी महापालिकेचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची २८ सप्टेंबर या दिवशी पणजी येथे भेट घेतली. काँग्रेसच्या विरोधात विधाने करत असल्याने सुरेंद्र फुर्तादो तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या भेटीनंतर सुरेंद्र फुर्तादो यांनी ‘मी काँग्रेसचाच आहे आणि यापुढेही काँग्रेसचाच रहाणार आहे’, असे पत्रकारांना सांगितले.
गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आय.ए.एस्.) यांना हटवा ! – काँग्रेसचे मुख्य निवडणूक आयोगाला पत्र
पणजी – गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आय.ए.एस्.) हे पक्षपातीपणा करत आहेत आणि यासाठी त्यांना त्या पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस अन् पक्षाचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे, अशी माहिती गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
गिरीश चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘कुणाल (आय.ए.एस्.) हे गेली ६ वर्षे गोव्यात राज्य मुख्य निवडणूक अधिकारीपदी आहेत; मात्र त्यांनी पूर्ण कार्यकाळ तटस्थपणे काम केलेले नाही. त्यांना राज्य मुख्य निवडणूक अधिकारी पदावरून हटवून त्याजागी नवीन अधिकार्याची नियुक्ती करावी. कुणाल (आय.ए.एस्.) यांचा राज्य मुख्य निवडणूक अधिकारी या नात्याने कार्यकाळही संपलेला आहे आणि त्यांच्याकडे शासनातील इतर खात्यांचेही दायित्व असल्याने त्यांना मुख्यमंत्री आणि भाजप शासनातील इतर मंत्री यांच्या आदेशाचे पालन करावे लागते. मागील निवडणुकीत त्यांनी भाजपला झुकते माप दिले होते.’’
लुईझिन फालेरो कोलकाता येथे पोचले : उद्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
पणजी – काँग्रेसचे नावेलीचे माजी आमदार लुईझिन फालेरो राज्यातील इतर काही नेत्यांसह २८ सप्टेंबर या दिवशी कोलकाता येथे पोचले आहेत. लुईझिन फालेरो आणि गोव्यातील इतर काही नेते तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. लुईझिन फालेरो यांनी २७ सप्टेंबर या दिवशी आमदारकीचे त्यागपत्र देऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. फालेरो २९ सप्टेंबर या दिवशी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.