शासनाला स्वातंत्र्यसैनिकांचा आदर नाही ! – गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पुतळा सापडला कंत्राटदाराच्या गोदामात !

मडगाव, ८ सप्टेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप शासनाला गोवा मुक्तीसाठी सर्वस्व वाहिलेले हुतात्मे, तसेच स्वातंत्र्यसैनिक यांच्याविषयी आदर नाही. मडगाव येथील लोहिया मैदानावरून गायब झालेला गोवा मुक्तीलढ्याचे प्रणेते डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पुतळा मैदानाचे सौंदर्यीकरणाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराच्या गोदामात सापडला. दुर्दैवाने लोहिया मैदानातील हुतात्मा स्मारक उघड्यावर टाकून दिलेले आहे, अशी माहिती गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर

गिरीश चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘शासनाने जर २४ घंट्यांच्या आत हुतात्मा स्मारक सुरक्षितस्थळी हालवले नाही, तर काँग्रेसचे कार्यकर्ते हे पुण्यकर्म करणार आहेत. गोवा शासन स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मा यांना वारंवार अपकीर्त करत आहे. भाजपचे बेगडी देशप्रेम यातून उघड होत आहे. लोहिया मैदानातील पुतळा, हुतात्मा स्मारक आणि ऐतिहासिक नामफलक हे केवळ अधिकृत अन् तज्ञ यांच्या देखरेखीखाली, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या मार्गदर्शनाखाली हाताळणे आवश्यक आहे.’’ (काँग्रेसला हे पुतळा गायब झाल्यावर लक्षात आले का ? – संपादक)

लोहिया मैदानात १९ डिसेंबरपूर्वी पुतळा बसवणार असल्याचे ठेकेदाराचे आश्वासन

मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी लोहिया मैदानाचे सौंदर्यीकरण करणार्‍या ठेकेदाराला डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पुतळा आणि स्मारक १९ डिसेंबरपूर्वी पुन्हा बसवण्याची सूचना केली आहे. यावर ठेकेदाराने पुतळा डिसेंबरपर्यंत पुन्हा बसवणार असल्याचे आश्वासन मडगाव नगरपालिकेला दिले आहे.