नागूपर येथे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या दीड लाख वाहनचालकांनी ७ कोटी रुपयांचा दंड थकवला !

अकार्यक्षम वाहतूक पोलीस यंत्रणा !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नागपूर – शहरात वाहतुकीचे नियम तोडणार्‍या वाहनांची छायाचित्रे ‘सी.सी.टी.व्ही.’त बंदिस्त झाल्यावर संबंधित वाहनचालकांच्या भ्रमणभाषवर ‘ई-चलान’ पाठवले जाते; पण नागपूर पोलिसांनी ‘ई-चलान’ पाठवूनही १ लाख ५० सहस्रांहून अधिक वाहनचालकांनी हा दंड भरलेला नाही. त्यामुळे ‘ई-चलान’ची थकित रक्कम ७ कोटी रुपये आहे. येथील पोलिसांच्या वाहतूक शाखेतील पोलीस उपायुक्त सारंग आव्हाडे यांनी वाहनधारकांना शुल्क भरण्याचे आवाहन केले आहे. (केवळ आवाहन करून काहीही होणार नाही. त्यापेक्षा विविध पथके नियुक्त करून पोलिसांनी ७ कोटी रुपयांचा दंड वसूल करायला हवा ! – संपादक) थकित दंड वसूल करण्यासाठी आणि बेलगाम वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी येथील वाहतूक पोलिसांनी ‘स्मार्ट नाकाबंदी’ लावून त्यातून ५ मासांत ५ कोटी ७० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे; मात्र अद्याप साधारण ३० टक्के वाहनचालकांनी ‘ई-चलान’ भरलेले नाही. (यावरूनच वाहनचालकांना ‘ई चलान’चाही धाक उरलेला नाही, असेच दिसून येते. – संपादक)