सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – म्हसवड (जिल्हा सातारा) येथे अन्यायकारक स्थानांतर केल्याचा आरोप करत शहर वाहतूक शाखेतील चालक विजय शंकरराव माळी यांनी आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळांद्वारे प्रसिद्ध केला होता. यानंतर पोलिसांनी माळी यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. तेव्हा माळी हे येवतेश्वर येथील एका हॉटेलमध्ये अर्धवट बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. याविषयीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.