दळणवळण बंदीमध्ये पूर्वाेत्तर भारतात चालू केलेल्या ‘ऑनलाईन’ स्वभावदोष निर्मूलन सत्संगाविषयी साधकांनी व्यक्त केलेले मनोगत !

१. सौ. मेघा पतेसरिया (राणीगंज, बंगाल)

१ अ. स्वभावदोष निर्मूलन सत्संगामुळे खर्‍या अर्थाने ही प्रक्रिया शिकून कृतीतही आणता येणे आणि त्यातून या प्रक्रियेचे महत्त्वही कळणे : ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने या दळणवळण बंदीमध्ये आरंभ झालेल्या ऑनलाईन स्वभावदोष निर्मूलन सत्संगामुळे ही प्रक्रिया खर्‍या अर्थाने शिकण्याची आणि ती कृतीत आणण्याची संधी प्राप्त झाली. यापूर्वी या प्रक्रियेविषयी माझ्यामध्ये गांभीर्य नव्हते. कधी स्वभावदोष निर्मूलनाची सारणी लिहित असे, तर कधी लिहित नसे, तसेच माझे स्वयंसूचनेची सत्रे मुळीच होत नव्हती. केवळ सांगण्यापुरती मी साधना करत होते; परंतु या सत्संगामुळे मला प्रक्रियेचे खरे महत्त्व लक्षात आले.

१ आ. स्वभावदोष निर्मूलन सत्संगामुळे स्वभावदोषांची जाणीव होऊन चुका स्वीकारता येऊ लागणे, मन शांत आणि सकारात्मक होणे : मी या सत्संगाशी जोडल्यापासून माझ्यामध्ये पालट होत असल्याचे लक्षात येऊ लागले. मला माझ्या चुका लक्षात येऊ लागल्या आणि त्या स्वीकारताही येऊ लागल्या. आता बर्‍याच वेळा चूक होण्यापूर्वीच मला त्याची जाणीव होते. आता स्वतःमध्ये किती स्वभावदोष आहेत आणि ‘प्रतिकूल परिस्थिती येते, तेव्हा ते कसे उफाळून येतात ?’, हे माझ्या लक्षात येत आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर माझे मन पुष्कळ शांत झाले आहे. मला सर्वांसमोर सहजतेने चुका सांगता येतात. आताही ‘चुका होत नाहीत’, असे नाही किंवा ‘मनात इतरांविषयी प्रतिक्रिया येत नाही’, असेही नाही; मात्र आता त्याची निदान जाणीव होऊ लागली आहे. स्वभावदोषांमुळे माझा पुष्कळ वेळ विचार करण्यात वाया जायचा. आता ही प्रक्रिया केल्यामुळे त्याचा अवधी न्यून झाला आहे आणि मन सकारात्मक झाले आहे. शंभूदादा (६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंभू गवारे) आणि मधुलिकाताई (६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुलिका शर्मा) मोकळेपणाने आमचे बोलणे ऐकून आम्हाला योग्य मार्ग दाखवतात.’

२. कु. एकता, देवघर, झारखंड.

२ अ. योग्य स्वयंसूचना घेतल्यामुळे ‘जे स्वभावदोष दूर होणे शक्यच नाही’, असे वाटायचे, ते दूर होऊन मन शांत होणे, वेळेचे योग्य नियोजन करता येऊ लागल्यामुळे वेळ वाया न जाता साधनेसाठी अधिक वेळ मिळणे : ‘स्वभावदोष निर्मूलन सत्संगाच्या माध्यमातून मला प्रक्रिया चांगल्या प्रकारे समजली. ‘जे स्वभावदोष दूर होणे शक्यच नाही’, असे मला वाटायचे, ते स्वभावदोष कृती आणि मन यांच्या स्तरावरून दूर झाले. माझ्या मनात पुष्कळ अनावश्यक विचार येत होते. एकच विचार पुनःपुन्हा मनात येऊन सर्व ऊर्जा वाया जात होती. या सत्संगामुळे मी योग्य स्वयंसूचना बनवायला शिकले. योग्य स्वयंसूचनेमुळे मनात येणारे अनावश्यक आणि नकारात्मक विचार दूर झाले अन् माझ्या मनाला शांती मिळाली. या सत्संगात मधुलिकाताई आणि शंभूदादा यांनी ‘दिवसभराचे नियोजन कसे करायचे ?’, हे पुष्कळ छान समजावून सांगितले. तसे नियोजन केल्यामुळे वेळ वाया जाणे बंद होऊन मला साधनेसाठी अधिक वेळ मिळू लागला.’

३. सौ. मीनू खैतान, धनबाद, झारखंड.

३ अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्यामुळे स्वतःच्या स्थितीत पुष्कळ पालट जाणवणे, साधकांकडून मार्गदर्शन मिळत असल्यामुळे उत्साह वाढणे आणि ही अद्भुत प्रक्रिया शिकवल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अत्यंत कृतज्ञता वाटणे : ‘पूर्वीच्या तुलनेत माझे स्वतःचे निरीक्षण वाढले आहे. माझ्या पूर्वीच्या आणि आताच्या स्थितीचा अभ्यास केल्यावर ‘गुरुदेवांनी आपल्याला किती अद्भुत प्रक्रिया शिकवली आहे ?’, असे वाटून पुष्कळ आनंद अन् कृतज्ञता वाटते. आज आम्हा सर्वांना या प्रक्रियेची पुष्कळ गोडी लागली आहे. त्यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. या सत्संगात साधकांकडून पुष्कळ ज्ञानवर्धक मार्गदर्शन मिळते. त्यामुळे उत्साह आणखी वाढतो.’

४. सौ. पूजा चौहान, रांची, झारखंड.

४ अ. सत्संगामुळे साधनेची गोडी वाढणे, चुकांची भीती न्यून होऊन चुका स्वीकारता येणे, ‘चुका होऊ नयेत’, यासाठी करायची उपाययोजनाही लक्षात येणे आणि व्यावहारिक जीवनातही पालट जाणवणे : ‘या सत्संगामुळे माझी साधनेची गोडी वाढू लागली आहे. आता थोडा मोकळा वेळ मिळाल्यावर लगेच ‘मी आता कुठली सेवा करू शकते ?’, असे विचार येतात. पूर्वी ‘माझ्या व्यस्ततेमुळे मी सेवा करू शकत नाही’, असे मला वाटायचे. पूर्वी माझ्या मनात ‘समष्टी सेवेत चुका होतील’, याविषयी भीती असायची. आता त्या चुका मला सहजतेने स्वीकारता येतात आणि ‘ती चूक होऊ नये’, यासाठी करायची उपाययोजना लगेच लक्षात येते. केवळ साधनाच नाही, तर माझ्या व्यावहारिक जीवनातसुद्धा परिवर्तन झाले आहे. त्यासाठी मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.’

५. श्रीमती बबिता गांगुली, कोलकाता, बंगाल.

५ अ. स्वभावदोष निर्मूलन सत्संगामुळे स्वयंसूचना योग्य प्रकारे बनवता येऊन ही प्रक्रिया नीट समजणे आणि साधकांच्या मार्गदर्शनाचाही लाभ होणे : ‘पूर्वी माझ्याकडून साधना, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी अत्यल्प प्रयत्न होत होते. हा स्वभावदोष निर्मूलन सत्संग आरंभ झाल्यापासून हळूहळू ही प्रक्रिया समजायला लागली. वेगवेगळ्या स्वयंसूचना पद्धतींविषयी सविस्तर समजले. प्रत्येक पद्धतीची सूचना देण्याचा नमुना सांगितल्यामुळे सूचना बनवणे सोपे झाले. मधुलिकाताईंमुळे झारखंड-बंगालच्या साधकांना ही प्रक्रिया नीट समजली. सत्संगात साधकांचे मार्गदर्शन मिळत असल्यामुळे आणखी चैतन्य लाभते.’

६. सौ. रेणु शर्मा, जमशेदपूर, झारखंड.

६ अ. सत्संगामुळे अंतर्मुखता वाढून स्वतःचे स्वभावदोष लक्षात येणे, त्यावर योग्य स्वयंसूचना बनवता येणे आणि त्यामुळे स्वभावदोष अल्प होत असल्याचे जाणवणे : ‘स्वभावदोष निर्मूलन सत्संगामुळे मला पुष्कळ लाभ झाला. माझा स्वतःचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न वाढला आहे. ‘मी कुठे अल्प पडते ? त्यामागे माझे कुठले स्वभावदोष आहेत ? मी काय करणे योग्य झाले असते ? मी कसा दृष्टीकोन ठेवायला पाहिजे ?’, अशा प्रकारचे विचार माझ्या मनात येऊ लागले आहेत. पूर्वी मी स्वयंसूचना बनवत होते; परंतु ती माझ्या अंतर्मनापर्यंत पोचत नव्हती. आता स्वयंसूचना बनवण्याची योग्य पद्धत वर्गात शिकवल्यानंतर त्यानुसार स्वयंसूचना बनवल्यामुळे ती अंतर्मनापर्यंत जाते आणि ज्या स्वभावदोषावर स्वयंसूचनेचे सत्र करते, ते परात्पर गुरुदेवांच्या कृपेने न्यून होत आहेत.’ (१.४.२०२१)