आंबोली घाटाची दुरवस्था झाल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना घेराव

असे करण्याची वेळ का येते ? स्वतःहून अडचणींची नोंद न घेणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक !

प्रतीकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेराव घालण्यात आला. या वेळी आंबोली घाटाची दुरवस्था, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी; चौकुळ-बेरडकी रस्ता, मळगाव घाट रस्ता आदी रस्त्यांची निकृष्ट कामे यांविषयी कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांना खडसावले.

आंबोली घाटात दरडी कोसळत असून गटार, नाले यांची सफाई झालेली नाही. उपजिल्हा रुग्णालयातील अर्धवट बांधकाम, चौकुळ-बेरडकी रस्त्याचे निकृष्ट काम, मळगाव घाट रस्ताच्या दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष आदी समस्यांकडे अधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यात आले.

कार्यकारी अभियंता माने यांनी या वेळी आंबोली, चौकुळ-बेरडकी या रस्त्यांची तातडीने पहाणी करण्याचे आश्‍वासन दिले, तर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचा कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) ८ दिवसांत काढण्याची ग्वाही दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, कौस्तुभ नाईक आदी उपस्थित होते.