समाजसाहाय्यासाठी पुढे या !

पुणे येथील संदीप काळे यांनी कोरोनाच्या संकटकाळाची आवश्यकता लक्षात घेऊन समाजसाहाय्यासाठी कौतुकास्पद पाऊल उचलले. गेल्या वर्षभरापासून ते अत्यावश्यक सेवेतील लोकांना विनामूल्य रिक्शासेवा उपलब्ध करून देत आहेत. कोरोनाच्या भीषण काळात नागरिकांना पावलोपावली कटू अनुभव येऊन पदरी निराशा पडत आहे. आज राज्यात ठिकठिकाणी ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार, रुग्णालय प्रशासनाची असंवेदनशीलता यांसह अनेक गोष्टींमुळे नागरिक त्रस्त आहेत. रुग्णवाहिकाचालकही मनमानी शुल्क आकारून रुग्णांची लूट करत आहेत. प्रशासकीय पातळीवरही नागरिकांची घोर उपेक्षा होत आहे. अशा नकारात्मक वातावरणात संदीप काळे यांच्यासारख्या माणुसकी जपणार्‍या व्यक्ती या नागरिकांचे आधारस्थान आहेत.

संदीप काळे (उजवीकडे)

कोरोनाचे संकट सर्वांसाठीच अनपेक्षित आणि आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे एकट्याने नाही, तर एकजुटीने लढा दिल्यासच या संकटाला तोंड देता येऊ शकते. यासाठी लोकांनी नि:स्वार्थीपणा बाजूला ठेवणे आवश्यक आहे. स्वत:चे कुटुंब रिक्शाच्या व्यवसायावर चालत असूनही दुसर्‍यांच्या समस्यांविषयी संवेदनशील असणे, ही श्री. काळे यांची त्यागी वृत्ती समाजघटकांनी शिकण्यासारखी आहे. संकटकाळात मिळालेले साहाय्य व्यक्तीला कायम स्मरणात रहाते. आता केवळ हे साहाय्य स्मरणात ठेवून चालणार नाही, तर स्वत:ही आपल्या परिने साहाय्यासाठी पुढे यायला हवे. हा वसा प्रत्येक व्यक्तीने घेतला, तर कोरोना संकटाची तीव्रता निश्‍चितच न्यून होऊ शकते.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, हे स्वत:ची सुरक्षा जोपासण्यासह एक प्रकारे समाजसाहाय्यही आहे. स्वत:च्या आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर गरजूंना आर्थिक साहाय्य करणे, हे धनाढ्यांचे नैतिक कर्तव्य आहे. सर्वसामान्यांची लूट करणार्‍यांना वैध मार्गाचा अवलंब करून धडा शिकवणे आणि पोलीस प्रशासनाला त्याची माहिती देणे, हे नागरिकांचे सामाजिक दायित्व आहे. प्रत्येकाने समाजसाहाय्याचा विचार करून पुढे येणे, हा कोरोनाच्या घोर संकटात नक्कीच आशेचा किरण ठरू शकतो !

– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.