सांगली, ७ एप्रिल – शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधानुसार महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवेची दुकाने सोडून अन्य दुकाने बंदच रहातील. रस्त्याऐवजी खुल्या भूखंडावर भाजी विक्री करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे, असे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. शासनाने घोषित केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने आयुक्तांनी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, शहर उपविभागीय अधिकारी अजित टिके, उपायुक्त राहुल रोकडे, नगरसेवक विष्णू माने उपस्थित होते.
आयुक्त म्हणाले, ‘‘रस्त्यावर भरणार्या भाजीपाला बाजारांचे विभाजन केले जाणार आहे. क्रीडांगणाच्या आवारात १०-१० भाजीवाले असे नियोजन केले आहे. भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी गर्दी झाली, तर भाजीपाला विक्रीसुद्धा बंद करावी लागेल. भाजीपाला विक्रेत्यांनी दिलेल्या जागेवरच गर्दी होणार नाही, याची दक्षता बाळगून व्यवसाय करावा. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने किंवा आस्थापन बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करावे.’’
या बैठकीस भाजीपाला संघटनेच्या प्रतिनिधी नगरसेविका (सौ.) स्वाती शिंदे, युवानेते श्री. पृथ्वीराज पवार, शिवसेनेचे श्री. शंभोराज काटकर, श्री. अमर पडळकर, रेखा पाटील आदी उपस्थित होते.