कोणत्याही प्रकारच्या दळणवळण बंदीस विरोध ! – समीर शहा, व्यापारी एकता असोसिएशन

सांगली, २९ मार्च (वार्ता.) – मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास ‘दळणवळण बंदीची सिद्धता करा’, असे निर्देश दिले आहेत, असे वृत्त प्रसिद्धीमाध्यमातून वाचण्यास मिळाले. व्यापारी गेल्या दळणवळण बंदीतून अद्याप सावरलेले नाहीत. बाजारपेठेतील १०० पैकी ८० टक्के व्यापारी अत्यंत वाईट स्थितीत आहेत. वर्ष २०१९ मध्ये आलेला महापूर आणि गतवेळची  दळणवळण बंदी यात शासन-प्रशासन यांनी व्यापार्‍यांना कोणते सहकार्य केले ? त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या दळणवळण बंदीस आमचा विरोध आहे, असे ‘व्यापारी एकता असोसिएशन’चे समीर शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

महापालिका आयुक्तांनी दुकान ‘सील’ करण्याची धमकी दिली आहे, हे आश्‍चर्यकारक आहे. महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन जर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवत असेल, तर आम्हाला ते काय सहकार्य करणार आहेत, हेही त्यांनी स्पष्ट करायला हवे. अनेक पर्याय चर्चेतून निघू शकतात. प्रशासन निर्णय लादणार असेल, तर व्यापार्‍यांना आंदोलन करावे लागेल, अशीही चेतावणी त्या पत्रकात देण्यात आली आहे.