माजलगाव (जिल्हा बीड) – भाटवडगाव येथील मधुकर कुलथे यांनी सलग दुसर्या वर्षी ३ सहस्र ५०० किलोमीटर पायी चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. कोरोनाच्या वैश्विक महामारीतून भारत देशासह जगाने लवकर बाहेर पडावे, तसेच अवघ्या विश्वाचे कल्याण व्हावे, या उद्देशाने ५ राज्यांतून ही परिक्रमा कुलथे यांनी केली आहे. धार्मिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असणारे कुलथे यांनी महावितरण आस्थापनामध्ये सेवा करण्यासमवेत कीर्तन आणि भजन या कार्यक्रमांतही पुढाकार घेतलेला आहे.
५ डिसेंबर २०२० ते २ मार्च २०२१ असे शंभर दिवस पायी भ्रमंती करत कुलथे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. ‘नर्मदा परिक्रमेमुळे नित्य पायी फिरणे, गोदावरी नदीवर स्नान करणे, मुक्त श्वास घेणे, विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन, अखंड नामस्मरणात रहाणे या कृती परीक्रमेत सतत चालू असतात. या कालावधीत वाद-विवाद, निंदा, स्तुती, चिंता यांपासून दूर राहिल्याने स्वाभावात पालट होतो. निसर्ग सहवासात अत्यल्प गरजांमध्ये साधे जीवन अनुभवण्यास मिळते’, असे कुलथे यांनी सांगितले.