पुणे, १४ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही प्रशासनाने पुणेकरांवर कुठलेही नवे निर्बंध न लादण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण वाढवणे आणि आरोग्य व्यवस्था सुधारणे यांवर भर देण्यात येईल, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विधान भवन येथे झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक वेगाने वाढत असल्याने लसीकरणात पुण्याला प्राधान्य मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.
काय आहे नवीन नियम ?
- पुण्यातील शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद रहातील; परंतु दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यातून सवलत देण्यात येईल.
- हॉटेलमध्ये एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्केच लोकांना अनुमती दिली असून दहा वाजेपर्यंत हॉटेल चालू ठेवता येतील, तर रात्री ११ वाजेपर्यंत घरपोच जेवण देता येईल.
- विवाह समारंभ, धार्मिक विधी, तसेच सार्वजनिक कार्यक्रम, अंत्यविधी आणि दशक्रिया विधी यांसाठी केवळ ५० लोकांनाच अनुमती आहे.
- नियम न पाळणार्यांवर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात येईल.
- पुण्यातील बागा केवळ सकाळी चालू रहातील, तर संध्याकाळी बंद रहातील.
- रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी असेल.
- एम्.पी.एस्.सी.चे कोचिंग क्लासेस आणि लायब्ररी यांच्या ५० टक्के क्षमतेनुसार विद्यार्थांना वापरता येईल.
- चित्रपटगृहे, मॉल आणि दुकाने रात्री १० पर्यंत चालू रहातील.