बीड – येथील एका मुकबधीर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तुकाराम कुडूक या नराधमाला न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या आरोपीचा शिक्षेचा निर्णय झाला, त्याच दिवशी २ पोलिसांनी उपाहारगृहामध्ये आरोपीसमवेत मद्यप्राशन करत मेजवानी केल्याचे समोर आले आहे. या मेजवानीचे ‘स्टिंग ऑपरेशन’ एका वृत्तपत्राने केले होते. या प्रकरणी साहाय्यक फौजदार नामदेव धनवडे आणि हवालदार सत्यवान गर्जे या दोन पोलिसांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (असे पोलीस कधीतरी गुन्हेगारांना गुन्ह्यांपासून रोखू शकतील का ? अशा प्रकारे कृती करणार्या पोलिसांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)
न्यायालयामध्ये उपस्थित करणारे पोलीस त्याच्याच समवेत एस्.पी. कार्यालयाजवळ असलेल्या एका उपाहारगृहात मेजवानीसह मद्यप्राशन करत बसले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक आर्. राजा आणि अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी गृह विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक उमेश कस्तुरे यांना चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.