शाहूपुरी (जिल्हा सातारा) येथील मिरचीच्या गोदामास आग !

लाखो रुपयांची हानी, आगीचे कारण अस्पष्ट

सातारा, १४ मार्च (वार्ता.) – शहरातील शाहूपुरी येथील मिरचीच्या गोदामास सकाळी ११ वाजता अचानक आग लागली. सातारा नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने आणि खासगी अग्नीबंबाने ही आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयांची हानी झाली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या बाजूलाच कच्छी यांचे मिरचीचे गोदाम आहे. अचानक या गोदामास आग लागली. ही आग विझवण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली; मात्र आग आटोक्यात येत नव्हती. गोदामातील मिरची आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे धुरांचे लोट उठत होते. त्यामुळे थोड्या वेळातच वातावरणातही ठसका जाणवू लागला. स्थानिकांनी सातारा नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला आणि खासगी अग्नीबंबाला पाचारण केले.