सभागृहाचे कामकाज बंद पाडू नये, यासाठी वीजजोडणी तोडण्याला स्थगिती दिली – उपमुख्यमंत्री अजित पवार

अजित पवार

मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वीजदेयकाच्या सूत्रावरून विरोधकांनी सभागृहाचे कामकाज बंद पाडू नये, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीजदेयके न भरलेल्या शेतकर्‍यांची वीजजोडणी तोडण्याला स्थगिती दिल्याचे १० मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील वीजजोडणी तोडण्यावरील स्थगिती उठवत असल्याचे विधीमंडळाच्या सभागृहात निवेदन केले. अजित पवार यांनी घोषित केलेली स्थगिती ऊर्जामंत्र्यांनी उठवल्याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता अजित पवार म्हणाले, ‘‘विजेच्या प्रश्‍नाच्या वेळी ऊर्जामंत्री गावाला गेले असल्यामुळे सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे सभागृह चालू ठेवण्यासाठी मी वीजजोडणी तोडण्याला स्थगिती घोषित केली.’’