सुश्रुतांच्या काळापासून आयुर्वेदात शस्त्रक्रियांचा उल्लेख आढळतो ! – केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक

श्रीपाद नाईक

पणजी – ‘माझीच उपचारपद्धत श्रेष्ठ’, असे कुणीही म्हणू नये. केंद्रशासनही कुणाची मक्तेदारी (मॉनोपॉली) मोडून काढू इच्छित नाही. एखाद्या औषधाने जर रुग्ण कायमचा बरा होत असेल, तर त्यामध्ये काय वावगे आहे ? आयुर्वेदात पदवी घेणारे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले यांना शस्त्रक्रिया शिकवली जाते. सुश्रुतांच्या काळापासून आयुर्वेदात शस्त्रक्रियांचा उल्लेख आढळतो. एखाद्या तालुका पातळीवर अशा प्रकारचे आयुर्वेदीय डॉक्टर उपलब्ध असल्यास ते ‘एखाद्या शेतकर्‍याला कोयत्याचा घाव बसून व्रण झाला असल्यास’ त्याच्यावर त्वरित उपचार करू शकतात. तालुका स्तरावरील केंद्रांमध्ये शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांचा अभाव आहे. याकडे कुणीही नकारात्मक दृष्टीकोनातून न पहाता ‘ते एक साहाय्यक आहेत’, अशा दृष्टीकोनातून म्हणजेच सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. आयुर्वेदातील औषधे सहस्रो वर्षांपासून आहेत आणि त्यांच्या घटकामध्ये आजही काहीच पालट झालेला नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. कर्नाटक राज्यात ते ११ जानेवारीला वाहन अपघातात गंभीररित्या घायाळ झाले होते. त्यानंतर उपचार घेऊन २४ फेब्रुवारी या दिवशी ते घरी परतले. या वेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. आयुर्वेदीय डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास अनुमती देण्यासंबंधीच्या उफाळून आलेल्या वादावरून विचारलेल्या प्रश्‍नाला त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.

ते पुढे म्हणाले, ‘‘कोरोना महामारीच्या काळात भारतीय उपचारपद्धतींवर लोकांचा मोठ्या प्रमाणावर विश्‍वास बसला आहे. भारताने १०० देशांना औषधे पाठवली आहेत आणि अनेक देश भारताकडे ‘एम्.ओ.यू.’ करार करण्याची मागणी करत आहेत. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात येथील संस्कृती, धर्म, परंपरा परकियांनी नष्ट केल्या, भारतियांना लुटले. देश स्वतंत्र झाल्यावर गेली ६० ते ६५ वर्षे योग, भारतीय उपचारपद्धती यांचा विकास केला गेलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रशासन हे काम आता करत आहे. भारत संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो. संत ज्ञानेश्‍वरांचे पसायदान हा आमचा जाहीरनामा आहे. यामध्ये ‘संपूर्ण जग सुखी व्हावे’, असे म्हटले आहे. आयुष मंत्रालय कोरोना महामारीवर मात करण्यासाठी ‘अश्‍वगंधा’, ‘आयुष ६४’ आदी औषधे लवकरच बाजारात उपलब्ध करणार आहे. गोव्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी प्रत्येकाने नियमांचे अजून किमान १ वर्ष तरी कठोरतेने पालन करावे.’’