पुणे – कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना पिंपरी-चिंचवड भाजपच्या महापौर उषा ढोरे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त २२ फेब्रुवारी या दिवशी चिंचवड येथे ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी ‘मास्क’ही परिधान केला नव्हता. महापौर उषा ढोरे यांनीही ‘मास्क’विना ‘रॅम्प वॉक’ केला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांप्रमाणे महापौर उषा ढोरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. याविषयी खासदार कोल्हे यांनी ट्वीटही केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही ट्वीट ‘टॅग’ केले आहे. (जनतेचे प्रतिनिधीच जर नियम न पाळता दायित्वशून्यपणे वागत असतील, तर ते जनतेपुढे काय आदर्श ठेवणार ? – संपादक)
खासदार डॉ. कोल्हे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी स्वत:चे पूर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत; मात्र महापौर ढोरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला, हे अतिशय खेदजनक आहे.