सोलापूर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सोलापूर शहर आणि जिल्हा या ठिकाणी २४ फेब्रुवारीपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. ही संचारबंदी ७ मार्चपर्यंत असणार आहे. ७ मार्चपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी यांची २४ फेब्रुवारी या दिवशी नियोजन भवन येथे भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीतील महत्त्वपूर्ण सूत्रे
१. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यातील ‘टेस्टींग’ (चाचण्या) वाढवण्यात येणार.
२. १० वी आणि १२ वी चे वर्ग चालू रहाणार.
३. क्रीडांगणावर ७ मार्चपर्यंत क्रीडा स्पर्धा भरवण्यास बंदी.
४. विवाह सोहळे, तसेच मंगल कार्यालय चालू रहातील; मात्र पोलिसांची अनुमती आवश्यक. विवाह सोहळ्यासाठी ५० लोकांची मर्यादा.
५. कर्नाटक राज्यातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणार्या नागरिकांना कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे.