महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांचे कारनामे, भानगडी आणि मुजोरीपणा यांमुळे जनता मेटाकुटीस ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

सांगलीत पत्रकार परिषदेत बोलतांना चंद्रकांत पाटील (मध्यभागी) आणि अन्य

सांगली, १४ फेब्रुवारी – महाराष्ट्रात विकास होईल अशी आशा जनतेला आहे; मात्र विकास करण्याचे दायित्व ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात अथवा कारनाम्यात लिप्त आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारमधील एका राजकीय नेत्याचे नाव सध्या समोर येत आहे. या राजकीय नेत्यामुळेच तरुणीने आत्महत्या केली अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांवर येत आहे. महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांचे कारनामे, भानगडी आणि मुजोरीपणा यांमुळे जनता मेटाकुटीस आली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी भाजप आमदार सुधीरदादा गाडगीळ, मकरंद देशपांडे सौ. नीता केळकर यांसह अन्य उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, काही दिवसांपूर्वी सरकारमधील एका मंत्र्याच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले. यानंतर त्या मंत्र्यांनी स्वत: त्यांचे अनैतिक संबंध आणि मुले असल्याची स्वीकृती दिली आहे. संपूर्ण राज्यात या सूत्रावर निदर्शने होऊनही या मंत्र्यांनी अद्याप त्यागपत्र दिलेले नाही. काही दिवसांपूर्वी सरकारमधील एका मंत्र्याच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली, तर एका मंत्र्यांनी थेट पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण केल्याने त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.