सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – मला मिळालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार हा माझा एकट्याचा नव्हे, तर तो माझ्या कलेचा, सिंधुदुर्गच्या भूमीचा आणि महाराष्ट्राचा सन्मान आहे, अशी भावना नुकताच पद्मश्री पुरस्कार घोषित झालेले श्री. परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केली.
‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त झाल्याविषयी श्री. गंगावणे यांचा जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. गंगावणे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत, श्री. गंगावणे यांचा मुलगा श्री. चेतन गंगावणे, अप्पर कोषागार अधिकारी भालचंद्र सावंत आदी उपस्थित होते.
श्री. गंगावणे पुढे म्हणाले की, गेली ५० वर्षे लोप पावत चाललेल्या या लोककलेचे जतन करण्याचे भाग्य मला लाभले. या कलेचे जतन करत असतांना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला; परंतु मी न डगमगता काम करत राहिलो. त्याचे आज फळ मिळाले. या पुरस्काराच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर आदिवासी लोकांची कला आज जगभर पोचली आहे, याचा मला आनंद आहे.