वाळपई, २६ जानेवारी (वार्ता.) – प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी सत्तरीतील भूमालकी प्रश्नासंबंधी लक्ष वेधण्यासाठी वाळपई येथे लोक एकत्र जमले होते. या वेळी वेगवेगळ्या गावांतील लोकांनी भूमीसंबंधी त्यांचे म्हणणे मांडले. आमच्या पूर्वजांनी राखलेल्या भूमी आमच्याच आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. पूर्वजांनी राखून ठेवलेली भूमी आमच्याच मालकीची असून त्यावर शासनाने अधिकार सांगू नये, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली. या वेळी सर्व गावांतील लोक एकत्र आले होते. आम्ही शासनाकडे भीक मागत नसून आमच्या हक्काची भूमी मागत आहोत, असे त्यांचे म्हणणे होते. या वेळी आमदार विश्वजित राणे यांच्यावर टीका करण्यात आली. विश्वजित राणे यांनी सत्तरीतील लोकांची दिशाभूल केली. त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी व्यासपिठावर येऊन आमच्याशी चर्चा करावी, असे आव्हान या वेळी सत्तरी तालुक्यातील नागरिक आणि अधिवक्ता शिवाजी देसाई यांनी विश्वजित राणे यांना दिले.
आय.आय.टी. संबंधी वाद मिटल्यानंतर आता सत्तरीतील सर्व गावांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भूमीपुत्रांच्या भूमीचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी या वेळी लावून धरण्यात आली. यावर आता शासनाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पहाणे महत्त्वाचे आहे.