खारेपाटण ते झाराप महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २ मासांत होणार ! – खासदार विनायक राऊत

कणकवली, १३ जानेवारी (वार्ता.) – महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नांदगाव, तळेरे, कासार्डे, कणकवली या ठिकाणच्या पुलांची कामे शिल्लक आहेत. ही कामे येत्या मासात मार्गी लागल्यानंतर दोन मासांत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लोकार्पणासाठी सज्ज होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. खारेपाटण ते झाराप या महामार्ग चौपदरीकरण कामाच्या पहाणीप्रसंगी कणकवलीत पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी कार्यकारी अभियंता सलीम शेख, उपअभियंता अमोल ओटवणेकर, ठेकेदार आस्थापनाचे व्यवस्थापक के.के. गौतम, केसीसी आस्थापनाचे व्यवस्थापक मनोज पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली शहरातील उड्डाणपुलाचे काम तातडीने करण्याच्या सूचना श्री. राऊत यांनी ठेकेदार आस्थापन आणि अधिकारी यांना दिल्या. शहरातील ‘मिसिंग प्लॉट’ची तातडीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करत शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करा’, असेही सांगितले.

या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानिकांच्या सोयीने उड्डाणपुलाचे काम होण्यासाठी विविध सूचना केल्या.