‘व्हॉट्सअॅप’ गटात हिंदु देवतांची अश्लील छायाचित्रे प्रसारित केल्याचे प्रकरण
डिचोली, ६ जानेवारी (वार्ता.) – सांखळी येथे ‘लॉकडाऊन’ या शीर्षकाखाली एक ‘व्हॉट्सअॅप’ गट कार्यरत आहे. या गटात हिंदु देवतांची अश्लील छायाचित्रे प्रसारित केल्याच्या प्रकरणी सांखळी येथील बसवराज मुचंडी याच्या विरोधात पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा प्रविष्ट करून त्याला कह्यात घेतले आहे. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते स्वतःच्या धर्मातील देवतांचे विडंबन करतात. अन्य धर्मातील व्यक्ती कधी त्यांच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करतात का ? – संपादक)
३ जानेवारीला संशयित बसवराज मुचंडी याने या ‘व्हॉट्सअॅप’ गटात हिंदु देवतांची अश्लील छायाचित्रे प्रसारित केली. यामुळे सांखळी परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर ‘लॉकडाऊन’ या ‘व्हॉट्सअॅप’ गटाचे ‘अॅडमिन’ दत्तराज चोडणकर यांनी याविषयी डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी यानंतर संशयिताच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून त्याला कह्यात घेतले. संशयिताच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम २९५ (अ) या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.